IND vs WI Women ODI 2019: स्मृती मंधाना हिचा वेस्ट इंडिजमध्ये धमाका; सौरव गांगुली, विराट कोहली यांना मागे टाकत नोंदवला 'हा' रेकॉर्ड, जाणून घ्या

वनडे क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण करणारी ती सर्वात वेगवान भारतीय महिला बनली आहे. यात तिने भारतीय कर्णधार विराट कोहली यालाही मागे टाकले आहे. मंधानाने केवळ 51 डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या.

स्मृती मंधाना (Photo Credit: Getty)

'कमबॅक गर्ल' स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि जेमीमह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) यांनी वेस्ट इंडिज (West Indies) महिला संघाविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला (Indian Team) मालिकेत विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. यासह मिताली राज हिच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. पायाच्या दुखापतीमुळे मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडलेल्या मंधानाने 63 चेंडूत 74 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 3 शतकारांचाही समावेश होता. स्मृतीने तिची सहकारी आणि सलामी फलंदाज जेमिमाहसह 141 धावांची भागीदारी करुन संघाला विजय मिळवून दिला. जेमिमाहने 92 चेंडूत 69 धावा केल्या. मंधाना आणि जेमिहमच्या मजबूत भागीदारीमुळे भारतीय संघाने 42.1 षटकांत 195 धावांचे लक्ष्य गाठले. या मॅचमध्ये स्मृतीने एका खास रेकॉर्डची नोंद केली आहे. (Video: हरमनप्रीत कौर हिने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या ODI मध्ये पकडला आश्चर्यकारक एक हाती कॅच)

वनडे क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण करणारी ती सर्वात वेगवान भारतीय महिला बनली आहे. यात तिने माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि विद्यमान कर्णधार भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यालाही मागे टाकले आहे. भारताकडून वनडे सामन्यात वेगवान दोन हजार धावा करणारी स्मृती दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. 23 वर्षीय मंधानाने केवळ 51 डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या. डावखुरा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या नावावर भारतासाठी सर्वात वेगवान 2000 वनडे धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने 48 डावांमध्ये हा पराक्रम केला होता. सौरवने 52 तर विराटने 53 डावांमध्ये 2000 वनडे धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 2 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमला (Hashim Amla) याच्या नावावर आहे. अमलाने 40 डावांमध्ये हा पराक्रम केला होता.

वनडेमध्ये मंधानाने 51 सामन्यांमध्ये 43.08 च्या सरासरीने 2,025 धावा केल्या आहेत. यात चार शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क (Belinda Clark) आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) या प्रकरणात आघाडीवर आहेत. बेलिंडाने हा पराक्रम 41 डावात तर लॅनिंगने 45 डावांमध्ये ही कामगिरी बजावली होती.