IND VS SL Pink Ball Test 2022: भारताच्या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, अवघ्या चार दिवसांत ‘हा’ संघ बेंगलोर कसोटीत करणार विजयाचा जल्लोष
पिंक-बॉल कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ञ आकाश चोप्रा यांनी या सामन्याबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे.
IND VS SL Pink Ball Test 2022: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात आज, 12 मार्च रोजी बंगळुरू येथे दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पिंक-बॉल कसोटी (Pink Ball Test) सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दिवस/रात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय ताफ्यात एक बदल करण्यात आला आहे. जयंत यादवच्या जागी अक्षर पटेलला दुसऱ्या कसोटीत स्थान देण्यात आले आहे. यादरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ञ आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी या सामन्याबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. या कसोटी सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुलाबी कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते असे सर्वांना वाटत असले तरी आकाश चोप्रा असे मानत नाही. (IND vs SL Pink-Ball Test Day 1: श्रेयस अय्यर याची झुंजार फलंदाज, षटकार खेचून साजरे केले दुसरे कसोटी अर्धशतक)
आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या संदर्भात म्हणाले, “नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करा. खेळपट्टीत दिसणारे गवत म्हणजे निव्वळ ढोकळा आहे. गुलाबी चेंडूने वेगवान गोलंदाजी करणे सोपे जाते असे म्हटले जाते. मात्र, जेव्हा मी खेळपट्टीचा अहवाल वाचला तेव्हा मला जाणवले की असे काहीही होणार नाही. पहिल्या सत्रात खूप धावा होणार आहेत कारण फ्लडलाइट्स लागल्यानंतर फलंदाजी करणे कठीण होईल.” इतकंच नाही तर आकाश चोप्रा यांनी पुढे सांगितले की भारत हा सामना चार दिवसात जिंकेल आणि दोन्ही संघांचे गोलंदाज मिळून 20 पेक्षा अधिक विकेट्स घेतील. “दोन्ही संघांचे फिरकीपटू मिळून 20 पेक्षा जास्त बळी घेतील. एकटे भारतीय फिरकीपटू 15-17 विकेट घेणार आहेत आणि जर भारताने तीन फिरकी गोलंदाज मैदानात उतरवले तर हा आकडा 18 वर पोहोचेल. मला वाटतं भारत चार दिवसात सामना जिंकेल.” गुलाबी चेंडूने वेगवान गोलंदाजांना नेहमीच मदत केली आहे आणि म्हणूनच संघ अतिरिक्त वेगवान गोलंदाज आणण्याचे धोरण आखतात.
दरम्यान,मोहाली कसोटीत टीम इंडियाने बॉल आणि बॅटच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. उल्लेखनीय आहे की दिवस/रात्र कसोटीत टीम इंडियाची कामगिरी शानदार राहिली आहे. भारताने आतापर्यंत तीन दिवस/रात्र कसोटी सामने खेळले असून दोन जिंकले आहेत. तर टीम इंडियाने घरच्या डे/नाईट कसोटीत दोन्ही विजय मिळवले आहेत.