IND vs SL, Pink Ball Test: 5 कसोटी खेळणारा गोलंदाज आता श्रीलंकेविरुद्ध कहर करणार, अष्टपैलू कामगिरी करण्यात आहे पटाईत
यापूर्वी स्टार अष्टपैलू अक्षर पटेल याच्या पुनरागमन मुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. या खेळाडूने आपल्या पहिल्याच दिवस-रात्र कसोटीत इतिहास रचला होता. खुद्द उपकर्णधार जसप्रीत बुमराहने या खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचे संकेत दिले आहेत.
IND vs SL, Pink Ball Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसरी कसोटी शनिवारपासून बंगळुरू येथे खेळली जाणार आहे. यापूर्वी मोहाली येथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला होता. जिथे टीम इंडियाने (Team India) दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर अवघ्या तीन दिवसात एक डाव आणि 222 धावांनी जिंकला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशा प्रकारे आता दुसरा कसोटी सामना, जो की गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे, रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिली कसोटी मालिका काबीज करण्याचा भारतीय संघाचा (Indian Team) निर्णधार असेल. आणि या दिवस-रात्र कसोटीसाठी टीम इंडियाने विशेष तयारी केली असून अक्षर पटेलच्या (Axar Patel) कमबॅकमुळे संघाची ताकद आणखी वाढली आहे. आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळलेल्या पटेलने विशेषतः गुलाबी चेंडूसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याच कारणामुळे अक्षय तंदुरुस्त होताच थेट टीम इंडियाशी जोडला गेला. (IND vs SL: ‘गार्डन सिटी’मध्ये कसोटीपूर्वी Jasprit Bumrah म्हणाला- ‘खेळपट्टीच्या आधारे ठरणार प्लेइंग-XI’, कुलदीप यादवला बाहेर करण्यावर दिले स्पष्टीकरण)
सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह पत्रकार परिषदेनंतर श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत अक्षर पटेल निश्चितपणे प्लेइंग-11 चा भाग असेल असे दिसत होते. याशिवाय असे झाले तर भारतीय संघाच्या या डेंजरमनचा सामना करणे श्रीलंकेसाठी कठीण होईल. यामागचे कारण म्हणजे प्रतिस्पर्धी संघांना आतापर्यंत अक्षरची फिरकी गोलंदाजी समजणे कठीण झाले आहे. पटेलचे आकडे पाहून तुम्हाला याची कल्पना येऊ शकते. लाल चेंडू हातात असो की गुलाबी, त्याने दोघांनीही कहरच केला आहे. अक्षरने आतापर्यंत गुलाबी चेंडूने 11 विकेट्स घेतल्या असून या बाबतीत तो रविचंद्रन अश्विन नंतरचा दुसरा यशस्वी भारतीय गोलंदाज आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने पाच वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत तर एकूण 36 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तो बॅटने देखील धावा करण्यात पटाईत आहे.
हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अक्षर दक्षिण आफ्रिका दौर्याला मुकला होता आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतूनही त्याला विश्रांती देण्यात आली होती. तसेच मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पटेल संघाचा भाग नव्हता. पण, दुसऱ्या कसोटीसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर बंगळुरू कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनेल असे दिसत आहे, मात्र कर्णधार रोहित शर्मासाठी प्लेइंग-11 फायनल करणे आव्हानात्मक ठरेल. कारण संघात रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे डावखुरे फिरकीपटू आधीच उपस्थिती आहेत व पहिल्या कसोटीत दोघांची कामगिरी उत्कृष्ट होती. अशा परिस्थितीत तिसऱ्या वेगवान गोलंदाजा ऐवजी संघ अक्षरच्या रूपात अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवतो की नाही हे उद्या टॉस वेळी कळेल.