IND vs SL 1st Test 2022: रवींद्र जडेजाने केला कहर, नाबाद दीडशतकी खेळीसह दिग्गजांना मागे टाकून बनला 1 नंबरी; पहा मोहालीत दुसऱ्या दिवशी पडला विक्रमांचा पाऊस
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताकडून रवींद्र जडेजाने लंकन गोलंदाजांवर दबदबा कायम ठेवला आणि आपल्या एका शतकी खेळीने दिग्गज खेळाडूंवर वर्चस्व गाजवले. दरम्यान मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काही महत्वपूर्ण रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत.
IND vs SL 1st Test 2022: मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चहापानाच्या वेळेपूर्वी भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या डावाच्या आधारे श्रीलंकेचा संघ अजूनही भारतापेक्षा 466 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 175 धावा करून लंकन गोलंदाजांवर दबदबा कायम ठेवला. त्याने या सामन्यात ऋषभ पंतच्या साथीने संयमी सुरुवात केली, पण एकदा लय पकडल्यास त्याने सुसाट फलंदाजी केली आणि आपल्या एका शतकी खेळीने दिग्गज खेळाडूंवर वर्चस्व गाजवले. दरम्यान मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काही महत्वपूर्ण रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SL 1st Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेच्या 4 बाद 108 धावा; पाहा भारताने किती धावांची आघाडी मिळवली)
1. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोहाली कसोटी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दमदार खेळी करत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. सातव्या किंवा त्याखालील कोणत्याही स्थानावर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांना मागे टाकले आहे. मोहालीत जडेजाने 164 धावा करताच तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्यापूर्वी देव यांनी सातव्या क्रमांकावर 163 धावांची खेळी केली होती.
2. रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात नाबाद 175 धावा केल्या. जडेजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही सर्वात मोठी खेळी आहे, तर कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे.
3. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मोहाली येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार कपिल देवच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. जडेजाने आपल्या शतकाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 400 पेक्षा जास्त विकेट घेणारा तो कपिल देव नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे.
4. श्रीलंकेविरुद्ध भारताने आपला पहिला डाव 574/8 धावांत घोषित केला आणि एक नवा विक्रम प्रस्थापित केला. मोहाली येथे एका डावात टीम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. या खेळीसह भारताने 17 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध केलेला स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. या मैदानावर 2005 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध 516 धावांचा डोंगे उभारला होता.
5. भारतीय संघाने 500 पेक्षा जास्त धावा केल्या असताना, सातव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा रवींद्र जडेजा पहिलाच फलंदाज बनला आहे.
6. भारताचा खेळाडू अष्टपैलू रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध केलेले शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक ठरले.
7. मोहाली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने नाबाद 175 धावांची खेळी केली. जडेजाने आपल्या फलंदाजीदरम्यान तीन फलंदाजांसह शतकी भागीदारी केली. त्याने सहाव्या विकेटसाठी ऋषभ पंतसोबत 104 धावांची भागीदारी केली, तर सातव्या विकेटसाठी आर अश्विनसोबत130 आणि नवव्या विकेटसाठी मोहम्मद शमीसोबत नाबाद 103 धावांची भागीदारी केली.