IND vs SA: कसोटी मालिकेपूर्वी Dean Elgar चे मोठे वक्तव्य; टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला म्हटले धोकादायक, कर्णधाराला आठवल्या 3 वर्ष जुन्या जखमा!

एल्गर म्हणाला की बुमराह एक भारतीय गोलंदाज आहे जो निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो. एल्गरने ऑनलाइन पत्रकार परिषदेत बुमराहचा धोका मान्य करत संपूर्ण भारतीय आक्रमणाचा सामना करणे आपल्या संघासाठी कठीण जाईल, असे सांगितले.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) कौतुक करताना कर्णधार डीन एल्गरने  (Dean Elgar) मान्य केले की परदेशात भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणात खूप सुधारणा झाली आहे. एल्गर म्हणाला की बुमराह हा एक भारतीय गोलंदाज आहे जो निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो. भारत 2018 नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कसोटी मालिका खेळणार आहे. गेल्या दौऱ्यात दमदार कामगिरी करूनही संघाला 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा यजमान संघात एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन, फाफ डू प्लेसिस, हाशिम आमला आणि व्हर्नन फिलँडर यांच्यासारखे अनुभवी खेळाडू होते पण सध्याच्या संघात त्यांच्यापैकी कोणीही नाही आहे. उल्लेखनीय म्हणजे भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज बुमराहने त्या मालिकेत कसोटी पदार्पण केले होते. एल्गरने ऑनलाइन पत्रकार परिषदेत बुमराहचा धोका मान्य करत संपूर्ण भारतीय आक्रमणाचा सामना करणे आपल्या संघासाठी कठीण जाईल, असे सांगितले. (IND vs SA Test 2021-22: भारताविरुद्ध कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज Anrich Nortje मालिकेतून आऊट)

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणाला, “बुमराह जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीचा चांगला फायदा घेणारा एखादा गोलंदाज असेल तर तो बुमराह असेल. पण आम्ही एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करत नाही. भारत हा मजबूत संघ आहे.” एल्गर म्हणाला, “गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भारत खूप चांगला संघ बनला आहे आणि अलीकडच्या काळात त्यांनी परदेशात चांगली कामगिरी केली आहे.” 2018 च्या दोन्ही संघात झालेल्या मालिकेत 40 पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी करणारा विराट कोहलीसोबत एल्गर हा एकमेव खेळाडू होता. लक्षात घ्यायचे की जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पदार्पण केले आणि 3 कसोटी सामन्यात 14 विकेट घेतल्या. तसेच त्याने एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केला होता. बुमराहची पहिली कसोटी विकेट डिव्हिलियर्सची होती. यानंतर बुमराहने ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्येही चमकदार कामगिरी केली आणि आता हा गोलंदाज अधिक धोकादायक बनला आहे. कदाचित त्यामुळेच त्याला यजमान संघासाठी सर्वात मोठा धोका मनाला जात आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला मालिकेच्या सलामीपूर्वी मोठा धक्का बसला आहे आणि एनरिच नॉर्टजे दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. कगिसो रबाडा यूकेमधील कोल्पाक करार संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी खेळण्यासाठी परतलेल्या ड्युआन ऑलिव्हर आणि लुंगी एनगिडी यांच्या कंपनीत यजमान संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटच्या उदयानंतर कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे रिक्त स्टेडियममध्ये मालिका खेळली जाईल याबद्दल एल्गर देखील निराश आहे.