IND vs SA 3rd Test Day 2: रोहित शर्मा दुहेरी शतकाच्या जवळ, Lunch पर्यंत टीम इंडियाचा स्कोर 357/4
तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या लंच पर्यंत भारताने 4 बाद 357 धावा केल्या आहेत. लंचपूर्वी भारताने रहाणेची विकेट गमावली.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तिसर्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस रांची येथे खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची खराब सुरुवात झाल्यावर सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चौथ्या क्रमांकावरील अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी कठीण काळात भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत उभे केले आहे. दुसऱ्या दिवसाच्या लंच पर्यंत भारताने 4 बाद 357 धावा केल्या आहेत. लंच पर्यंत रोहित 199 धावांवर खेळत होता. लंचपूर्वी भारताने रहाणेची विकेट गमावली. रहाणे शतक करत 115 धावांवर आऊट झाला. यापूर्वी, रहाणेने 11 टेस्ट आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसरे टेस्ट शतक केले. सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय संघाचे फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी सावध फलंदाजी केली. रहाणेने रोहितला चांगली साथ दिली. जॉर्ज लिंडे याने रहाणेला बाद करत त्याच्या आणि रोहितच्या 267 धावांची भागी संपुष्टात आणली. (IND vs SA 3rd Test Day 2: अजिंक्य रहाणे याची दमदार खेळी, टेस्ट क्रिकेटमध्ये झळकावले 11 वे शतक; रोहित शर्मा 150 पार)
रहाणे मागोमाग रोहितने 150 धावा पूर्ण केल्या. एका मालिकेत दोनदा 150 धावा करणारा रोहित 11 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहितने पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात दीडशे धावांचा टप्पा गाठला होता. रोहित सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताच्या हिटमॅनला वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत खेळायची संधी मिळाली नव्हती, त्यामुळे आफ्रिकी मालिकेचा तो पूर्ण फायदा करून घेत आहे. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी रोहितनेआफ्रिकाविरुद्ध एका मालिकेत सर्वाधीक 400 धावा करण्याचा विक्रम केला.
पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत भारताची खराब सुरुवात झाली. सुरुवातीलाच भारताने तीन महत्वाचे विकेट गमावले. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात तीन विकेट्स गमावून 224 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी रोहितने नाबाद 117 आणि रहाणे नाबाद 83 धावा केल्या होत्या.