IND vs SA 2nd Test Day 1: टीम इंडिया मजबूत स्थितीत, पहिल्या दिवसाखेर भारताचा स्कोर 273/3

भारताने पहिले फलंदाजी करत पहिल्या दिवसाखेर 3 गडी गमावून 273 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद 63 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद 18 धावांवर खेळत आहेत.

मयंक अग्रवाल (Photo Credits: Twitter)

दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध दुसऱ्या टेस्टचा पहिला दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. भारताने पहिले फलंदाजी करत पहिल्या दिवसाखेर 3 गडी गमावून 273 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 63 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाबाद 18 धावांवर खेळत आहेत. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील 3 सामन्यांच्या मालिकेचा दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. पहिल्या मॅचच्या दोन्ही डावांमध्ये शतक करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त 14 धावाच करू शकला. भारताकडून सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याने 108 धावांची खेळी साकारली. (IND vs SA 2nd Test Day 1: मयंक अग्रवाल याचे सलग दुसरे शतक, केली 'या' विक्रमांची नोंद)

रोहित बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा याने मयंकला चांगली साठी दिली आणि संघाचा डाव सावरला. मयंक आणि पुजाराने शतकी भागीदारी केली. मयंकने चौकार मारत टेस्ट कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले आणि पुजारासह शतकी भागीदारीदेखील पूर्ण केली. त्यानंतर पुजाराने देखील अर्धशतक केले पण, 55 धावा करून माघारी परतला. त्यानंतर, मयंकने विराटच्या साथीने डाव सावरला. यादरम्यान, मयंक दुसरे टेस्ट शतक करत कगिसो रबाडा याचा शिकार बनला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट आणि रहाणे नाबाद अनुक्रमे 63 आणि 18 धावांवर खेळात होते. आफ्रिकेसाठी रबाडाने सर्व तीन गडी बाद केले. अन्य कोणत्याही गोलंदाजाला पहिल्या दिवशी विकेट घेता आली नाही.

दरम्यान, सलग अकरावी कसोटी मालिका रेकॉर्ड जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ घरच्या मैदानावर उतरेल. ही मालिका तीन कसोटी सामन्यांची आहे. टीम इंडिया फेब्रुवारी 2013 पासून सतत घरच्या मैदानावरील कसोटी मालिका जिंकत आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सलग 10-10 कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्याची बरोबरी आहे.