IND vs SA 1st Test: सेंच्युरियनमध्ये शतक ठोकून स्वत:लाच केले चकित, बॉक्सिंग डे शतकवीर KL Rahul ने सांगितले कारण
भारतीय सलामीवीर राहुल म्हणाला की, सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तो किती शांत होता हे पाहून त्यालाच आश्चर्य वाटले.
टीम इंडियाचा सलामीवीर आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) सेंच्युरियनमध्ये शतक झळकावून बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाखेरीस नाबाद परतला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय सलामीवीर राहुल म्हणाला की, सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तो किती शांत होता हे पाहून त्यालाच आश्चर्य वाटले. विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाने येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व राखले आणि पहिल्या दिवशी 272/3 धावांपर्यंत मजल मारली. राहुल 122 आणि अजिंक्य रहाणे 40 धावांवर नाबाद खेळत असून दुसऱ्या दिवशी भारताला मोठी धावसंख्या उभारण्याचा निर्धार असेल. (IND vs SA 1st Test Day 2 Centurion Weather: दिवसाच्या सुरुवातीला पावसाचा अडथळा, सेंचुरियन येथे सामना सुरु होण्यास उशीर होण्याची शक्यता)
बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “हे खूप खास आहे, प्रत्येक शतक तुमच्यामध्ये काहीतरी नवीन दाखवते आणि तुम्हाला वेगळा आनंद देते. जेव्हा तुम्ही शतक करता तेव्हा तुमच्या मनात त्याबद्दल अनेक भावना असतात. तुम्ही 6-7 तास फलंदाजी करता, अशा खेळी खूप खास असतात. आम्ही अशा बदलांचा खरोखर आनंद घेतो. माझ्याकडून तेच अपेक्षित आहे.” तो पुढे म्हणाला, “जेव्हा मी चांगली सुरुवात करतो तेव्हा मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेऊ लागतो. या सामन्यात मी तेच केले असे मला वाटते.” मयंक अग्रवालने राहुलसोबत डावाची जोरदार सुरुवात केली आणि तो 60 धावा करून बाद झाला. या दोघांनी मिळून भारताला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. कर्णधार विराट कोहली 35 धावा करून बाद झाला. विराट चांगल्या लयीत दिसत होता, मात्र पुन्हा एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आऊट होऊन माघारी परतला.
राहुल म्हणाला, “आमची तयारी खूप चांगली होती, पहिल्या दिवशी फलंदाजी करणाऱ्या सर्वांचे लक्ष केंद्रित होते. जेव्हा मी मैदानावर पाऊल ठेवतो तेव्हा मी फक्त त्या क्षणी असण्याचा विचार करतो. मी किती शांतपणे खेळलो याचे मलाच आश्चर्य वाटते. पहिल्या दिवशी मी संघाला चांगल्या स्थितीत आणू शकलो याचा मला आनंद आहे.”