IND vs NZ 1st ODI: विराट कोहली ने केली सचिन तेंडुलकर ची बरोबरी, भारत-न्यूझीलंड सामन्यात बनलेले 'हे' 7 प्रमुख रेकॉर्डस्, पाहा

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 4 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली, श्रेयसपासून टेलरने विक्रमी कामगिरीची नोंद केली. जाणून घ्या.

विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

टी-20 मालिकेत 5-0 ने न्यूझीलंडचा (New Zealand) क्लीन स्वीप केल्यावर आज भारत (India) आणि न्यूझीलंडमध्ये वनडे मालिकेतील पहिला सामना हॅमिल्टनमध्ये खेळला गेला. पहिले फलंदाजी करत भारतीय संघाने (Indian Team) सामन्यात मोठी धावसंख्या उभारली, मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 4 गडी राखून सामना जिंकला. न्यूझीलंडविरुद्ध आजच्या सामन्यात पृथ्वी शॉने 20, मयंक अग्रवाल ने 32 धावा केल्या. विराट कोहलीने (Virat Kohli) 51 धावांचे योगदान दिले. यानंतर श्रेयस अय्यरने 107 चेंडूंत 103 धावांची चमकदार खेळी खेळली, तर विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलने 64 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 347 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडची चांगली सुरूवात मिळाली, त्यानंतर अनुभवी रॉस टेलर याने नाबाद शतकी कामगिरी करत संघाचा विजय निश्चित केला. हेन्री निकोल्स (Henry Nicholls) आणि कर्णधार टॉम लाथम (Tom Latham) यांनी अर्धशक्ती खेळी करत टेलरला चांगली साथ दिली. (IND vs NZ 1st ODI: श्रेयस अय्यर वर भारी पडले रॉस टेलर चे शतक, टीम इंडियाविरुद्ध 4 विकेटने विजय मिळवत न्यूझीलंडने घेतली 1-0 आघाडी)

दरम्यान या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली, श्रेयसपासून टेलरने विक्रमी कामगिरीची नोंद केली. जाणून घ्या:

1. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत श्रेयसने शतक पूर्ण केले. या स्थानावर खेळत तब्बल 2 वर्षानंतर एका भारतीय फलंदाजाने शतक झळकावले. यापूर्वी 2018 मध्ये अंबाती रायुडूने वनडे सामन्यात 4 क्रमांकावर खेळत शतक झळकावले होते. एवढेच नव्हे, तर 2011 पासून आजवर भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फक्त 5 फलंदाजांनी शतकं केली आहेत.

2. कोहलीने 63 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. या अर्धशतकासह कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 13 वेळा वनडे सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या. साचीनेही न्यूझीलंडविरुद्ध 13 वनडे सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

3. कोहलीने आपल्या कारकिर्दीतील 58 वे अर्धशतक झळकावले आणि मोहम्मद अझरुद्दीन याच्या 58 अर्धशतकांची बरोबरी केली आहे आणि भारतासाठी सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत कोहली आता पाचव्या स्थानावर आला आहे.

4. गेल्या 4 वनडे सामन्यात कोहलीला 3 वेळा फिरकी गोलंदाजाने बाद केले आहे. तो अ‍ॅडम झांपाने 2 वेळा आणि इश सोधीने त्याला एकदा बाद केले. विराटचा हा नकारात्मक रेकॉर्ड भारतासाठी चिंताजनक आहे.

5. आजच्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी एकत्र डेब्यू केले. भारतीय क्रिकेट इतिहासात एका सलामी जोडीने एकत्र आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची ही फक्त चौथी वेळ आहे. यापूर्वी, केएल राहुल आणि करुण नायर यांनीदेखील एकाच सामन्यात आपली कारकीर्द सुरू केली आणि सलामीची जोडी म्हणून दोघे एकत्र आले होते.

6. किवींचा मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरने 17 धावा केल्या तेव्हा त्याच्या नावावर विक्रम जोडला गेला. भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. टेलरने भारताविरुद्ध आजवर 33 सामन्यांच्या 32 डावांमध्ये 1300 धावा केल्या आहेत. यात भारताविरुद्ध 112 धावांच्या सर्वात नाबाद खेळीचाही समावेश आहे.

7. 63 चेंडूंत 51 धावा करणारा कोहलीकडे सध्या कर्णधार म्हणून 5,123 धावा केल्या असून त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीला कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांच्या एलिट यादीत मागे टाकले. गांगुलीने कर्णधार म्हणून वनडे सामन्यात 5082 धावा केल्या आहेत.

दरम्यान, हॅमिल्टनमधील सामना जिंकत किवी संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारत-न्यूझीलंडमधील दुसरा वनडे सामना शनिवार 8 फेब्रुवारी रोजी ऑकलँडच्या इडन पार्क मैदानावर खेळला जाईल.