IND vs ENG Test Series 2021: भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर, चेन्नई येथील दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी 'इतक्या' प्रेक्षकांना मिळू शकतो ग्रीन सिग्नल
मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी चाहत्यांसमोर एक मोठी बातमी समोर आली आहे. दुसर्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते.
IND vs ENG Test Series 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नई (Chennai) येथे खेळले जाणार आहेत, पण भारतीय चाहत्यांसाठी मात्र पहिल्या सामन्यासाठी स्टेडियम बंद करण्यात आले आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी चाहत्यांसमोर एक मोठी बातमी समोर आली आहे. दुसर्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. चेन्नई येथे यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यात 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी मिळू शकते. कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करत सरकारने ओउटडोर स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली होती. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) संधीचा फायदा करून घेऊ इच्छित असेल आणि 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देऊ शकतो. (IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा दबदबा! इंग्लिश टीमविरुद्ध टेस्ट सामन्यात आतापर्यंत ठोकली आहे 5 शतके)
“आम्हाला 5 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टसाठी प्रेक्षकांच्या प्रवेशाला परवानगी देण्याची वेळ नाही, कारण आम्हाला शनिवारी सरकारची अधिसूचना मिळाली. तुम्ही अशा छोट्या सूचनेवर प्रेक्षकांच्या प्रवेशाचे आयोजन करू शकत नाही," TNCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले. “पण हो, आता नव्या मार्गदर्शक सूचनांसह, 13 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसर्या कसोटीत अधिसूचनेनुसार प्रेक्षक असण्याची शक्यता आहे,” अधिकाऱ्याने पुढे म्हटले. चेपॉक स्टेडियममध्ये (Chepauk Stadium) एकावेळी 50,000 प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. अहमदाबादच्या मोटेरा येथील नूतनीकरण झालेल्या सरदार पटेल स्टेडियमवर होणाऱ्या तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांचा प्रवेश निश्चित दिसत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, सोमवारपासून सुरू होणारी कार्यपद्धती ठरवण्यासाठी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि टीएनसीए अधिकारी यांच्यात अनेक बैठका होणार आहेत.
ते म्हणाले, "मोटेरा येथे प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल हे नेहमीच स्पष्ट होतं. पण, आता आम्हाला मार्गदर्शक सूचना मिळाल्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याचे नियोजन पुन्हा सुरु करता येईल." दरम्यान, टीएनसीए माध्यमांना प्रेस बॉक्समधून कव्हर करण्याची परवानगी देण्यावर विचार करत आहे. तथापि, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मीडिया कॉन्फरन्स अजूनही दूरस्थपणे आयोजित केल्या जातील.