IND vs ENG Series 2021: दुखापतग्रस्त खेळाडूंची बदली म्हणून भुवनेश्वर कुमार सह श्रीलंका दौऱ्यावरील तीन खेळाडू होऊ शकतात ब्रिटनला रवाना
या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे तीन खेळाडू बाहेर पडले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या तीन जखमी खेळाडूंच्या जागी बीसीसीआय भुवनेश्वर कुमार याच्यासह तीन खेळाडू पाठवू शकते. भुवनेश्वर कुमार सध्या श्रीलंका दौर्यावर असून एकदिवसीय आणि टी-20 संघाचा उपकर्णधार आहे
IND vs ENG Series 2021: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला (Indian Team) तीन झटके बसले आहेत. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे तीन खेळाडू बाहेर पडले असून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill), युवा गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) आणि युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांचा समावेश आहे. यापैकी पहिला शुभमन गिल जखमी होता, त्यावेळी भारतीय निवड समितीने त्याच्या जागी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्क्ल यांना इंग्लंडला पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर देखील दुखापतींच्या यादीत सामील झाले आहेत. यादरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या तीन जखमी खेळाडूंच्या जागी बीसीसीआय (BCCI) भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्यासह तीन खेळाडू पाठवू शकते. (IND vs ENG 2021: सराव सामना अनिर्णीत राहूनही टीम इंडियाला झाला ‘असा’ फायदा, पाहा कोणत्या खेळाडूंनी केली कमाल)
भुवनेश्वर कुमार सध्या श्रीलंका दौर्यावर असून एकदिवसीय आणि टी-20 संघाचा उपकर्णधार आहे तसेच भारतीय वेगवान गोलंदाजी हल्ल्याचे देखील तो नेतृत्व करत आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खेळाडूंना त्वरित इंग्लंडला पाठविण्याची गरज आहे की नाही हे आम्ही पाहू. सध्या इंग्लंड दौर्यावर गेलेल्या 24-सदस्यीय भारतीय संघातील तीन खेळाडूंना आधीच वगळण्यात आले आहे. यापूर्वी पृथ्वी आणि पडिक्क्लला इंग्लंडला पाठवण्याची टीम इंडियाची मागणी फेटाळण्यात आली होती. मात्र, आता या तिन्ही खेळाडूंपैकी एक भुवी असू शकतो, असे वृत्तात म्हटले जात आहे. पण या खेळाडूंना श्रीलंकेतून ब्रिटनला पाठवणे बीसीसीआयसाठी इतके सोप्पे होणार नाही कारण इंग्लंड सरकारच्या 'रेड लिस्ट'मध्ये श्रीलंकेचा समावेश आहे. यावर निर्णय घेण्यापूर्वी मंडळाकडून काही आव्हानांबाबत माहिती घेत आहे. तसेच बबल-टू-बबल ट्रान्सफर देखील शक्य नाही. त्यामुळे, गरज पडल्यास किती खेळाडू पाठवावेत हे निवड समिती निर्णय घेतील.
दरम्यान, भुवीला इंग्लंड मालिकेसाठी पाठवले गेले तर तो इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर तो खूप प्रभावी ठरू शकेल कारण तो चेंडू स्विंग करण्यात तज्ज्ञ आहे. भुवी तब्बल तीन वर्षांपासून भारतासाठी कसोटी सामने खेळलेला नाही.