IND vs ENG 5th T20I 2021: Chris Jordan ने बाउंड्री लाईनवर घेतला अविश्वसनीय कॅच, व्हिडिओ करेल हैराण
त्याने इंग्लिश गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. यादरम्यान, इंग्लिश फिरकीपटू आदिल रशीदच्या चेंडूवर सूर्याने मोठा फटका खेळला जो पुन्हा एकदा सीमारेषेपार जाणार असे दिसत होते, मात्र अष्टपैलू क्रिस जॉर्डनने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवत बाउंड्री लाईनवर जबरदस्त कॅच पकडला.
IND vs ENG 5th T20I 2021: इंग्लंड (England) संघाविरुद्ध टी-20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघ (Indian Team) मैदानावर उतरला आहे. आजच्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीची जोडी सलामीला उतरली. दोघांनी इंग्लंड गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि चौकार-षटकारांची बरसात केली. दोंघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली त्यानंतर बेन स्टोक्सने रोहितचा त्रिफळा उडवत 'हिटमॅन'ला माघारी पाठवलं. त्यानंतर, विराटने सूर्यकुमार यादवसह (Suryakumar Yadav) डाव पुढे देत पुन्हा एकदा मोठी भागीदारी केली. सूर्याच्या बॅटची जादू आजच्या सामन्यात देखील पाहायला मिळाली. त्याने इंग्लिश गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. यादरम्यान, इंग्लिश फिरकीपटू आदिल रशीदच्या (Aadil Rashid) चेंडूवर सूर्याने मोठा फटका खेळला जो पुन्हा एकदा सीमारेषेपार जाणार असे दिसत होते, मात्र अष्टपैलू क्रिस जॉर्डनने (Chris Jordan) आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवत बाउंड्री लाईनवर जबरदस्त कॅच पकडला. (IND vs ENG 5th T20I 2021: हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम, ‘या’ टी-20 यादीत विराट कोहलीनंतर पटकावले दुसरे स्थान)
सूर्यकुमारच्या रूपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. सूर्याने चेंडू उडवला जो सीमारेषेपार जाताना दिसत असताना लॉन्ग-ऑनवरून जॉर्डन धावत आला आणि एका हाताने झेल पकडला पण आपण बाउंड्री लाईनपार करणार असे कळताच त्याचे दुसऱ्या दिशेला असलेल्या जेसन रॉयकडे चेंडू फेकला ज्याने चूक न करता आपल्या जागी उभे राहत सोप्पा कॅच पकडला. जॉर्डनचे हे अविश्वसनीय प्रयत्न पाहून रॉयच नव्हे तर सोशल मीडियावर यूजर्स देखील हैराण झाले. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असून दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत, त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ कोणतीही कसर सोडणार नाही.
आजच्या निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये इंग्लंडने कोणताही बदल केलेला नाही तर भारतीय संघात एक बदल झाला आहे. राहुलला वगळले असून विराट सलामीला आला आणि गोलंदाजीक्रम मजबूत करण्यासाठी तंदुरुस्त झालेल्या टी नटराजनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.