IND vs ENG 4th Test: ओव्हलवर भारताचा दे दणादण! भारताचे दिग्गज कर्णधारही जिथे ठरले फ्लॉप तिथे ‘विराटसेने’कडून अजित वडेकरांच्या संघाच्या ‘या’ कामगिरीची पुनरावृत्ती
वाडेकर यांनी भारताला इंग्लंडच्या भूमीवर 1971 मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकून दिली होती.
Virat Kohli Equals Ajit Wadekar's Unique Feat: इंग्लंडविरुध्द्व (England) ओव्हल मैदानावर (The Oval) खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेच्या चौथ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) भारतीय संघाने (Indian Team) दणदणीत विजय मिळवला आणि माजी कर्णधार अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांच्या अनोख्या विक्रमाची बरोबरी केली. वाडेकर यांनी भारताला इंग्लंडच्या भूमीवर 1971 मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकून दिली होती. वाडेकरांच्या संघाने 1971 मध्ये यजमानांविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने बरोबरीत सोडवले होते, आणि नंतर ओव्हलवरील अंतिम तिसरा कसोटी सामना चार गडी राखून जिंकून मालिका 1-0 ने जिंकली होती. या सामन्यापूर्वी दोन्ही देश ओव्हल मैदानावर 13 वेळा भिडले होते. ज्यात भारताने एक सामना जिंकला, तर इंग्लंडने पाच सामने जिंकले आणि 7 सामने अनिर्णित राहिले. अशाप्रकारे 50 वर्षानंतर भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात मोठा कारनामा केला जो सौरव गांगुली, राहुल द्रविड यांच्यासारख्या दिग्गज भारतीय कर्णधारांनाही कधी जमला नाही. (IND vs ENG 4th Test: ओव्हलवर ‘विराटसेने’ने बदलला इतिहास; इंग्लंडला लोळवत मारलं मैदान, 50 वर्षांनंतर उघडले विजयाचे खाते)
ओव्हलच्या मैदानावर भारताचा पहिला डाव 191 धावांवर आटोपला होता. मात्र दुसऱ्या डावात त्यांनी शानदार खेळी करत 466 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडपुढे विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तसेच इंग्लंडसाठी रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत आश्वासक सुरुवात केली होती. तथापि सामान्याच्या पाचव्या व अंतिम दिवशी गोलंदाजांनी सामन्याचे चित्रच बदलून टाकले आणि भारताच्या पारड्यात विजय टाकला. भारतासाठी उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
ओव्हर ग्राउंडवर आतापर्यंत भारताची कामगिरी
ओव्हल मैदानावर इंग्लंड आणि भारत संघात अनेक संस्मरणीय सामने खेळले गेले, पण भारतासाठी ते नशीबवान ठरले नाहीत. भागवत चंद्रशेखर (18.1-3-38-6) यांच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये शेवटची कसोटी जिंकली होती. बीएस चंद्रशेखर यांनी 38 धावांवर सहा विकेट्स घेतल्या ज्यामुळे इंग्लंड दुसऱ्या डावात केवळ 101 धावांवर बाद झाला आणि भारताचा विजयाचा मार्ग मोकळा केला. तसेच फारुख अभियंता, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप सरदेसाई आणि वाडेकर देखील भारताच्या या ऐतिहासिक विजयाचे नायक होते. विशेष म्हणजे 1971 मध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी मन्सूर अली खान पतौडी यांच्या जागी वाडेकर यांना नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती.