IND vs ENG 4th Test: इंग्लंड खेळाडूंना ‘ही’ मोठी चुक पडली सर्वात महाग, ओव्हल टेस्टमध्ये Rohit Sharma ने संपुष्टात आणला परदेशात कसोटी शतकाचा दुष्काळ

इंग्लंडविरुद्ध लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतासाठी दुसऱ्या डावात फलंदाजीला येत ‘हिटमॅन’ने 204 चेंडू खेळत मोईन अलीच्या गोलंदाजीवर शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठला. रोहितच्या परदेशातील पहिल्या कसोटी शतकात रोरी बर्न्सने प्रमुख भूमिका बजावली.

रोहित शर्मा परदेशात पहिले टेस्ट शतक (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test: भारताचा (India) तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्माची (Rohit Sharma) परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये शतकाचा दुष्काळ अखेर संपुष्टात आला आहे. इंग्लंडविरुद्ध (England) लंडनच्या ओव्हल (The Oval) मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतासाठी दुसऱ्या डावात फलंदाजीला येत ‘हिटमॅन’ने 204 चेंडू खेळत मोईन अलीच्या (Moeen Ali) गोलंदाजीवर शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठला. 2013 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत भारतात आतापर्यंत सात कसोटी शहतक करणाऱ्या रोहितला तब्बल आठ वर्ष परदेशात शतकाची प्रतीक्षा करावी लागली. रोहितच्या परदेशातील पहिल्या वहिल्या कसोटी शतकात इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सने (Rory Burns) प्रमुख भूमिका बजावली. बर्न्सच्या दोन चुका भारतीय संघासाठी वरदान ठरल्या आणि रोहितने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चांगली फलंदाजी करत इंग्लिश संघाला जोरदार झटका दिला. चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी रोहित बाद होण्यापासून तीनदा थोडक्यात बचावला. (IND vs ENG 4th Test: रोरी बर्न्सने स्लिपमध्ये केली मोठी चूक, इंग्लंडला भोगावे लागणार परिणाम)

भारताच्या दुसऱ्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉल रोहितच्या बॅटच्या काठावर लागला. पण दुसऱ्या स्लिपमध्ये उभा असलेल्या बर्न्सने मोठी चूक केली. त्याचे चेंडूकडे अजिबात लक्ष नव्हते आणि यामुळे तो झेल पकडण्याचा प्रयत्नही करू शकला नाही. बॉल थेट त्याच्या बुटाला लागून बाउंड्रीच्या दिशेने गेला. परिणामी हिटमॅनला मोठे जीवनदान मिळाले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी देखील बर्न्सने तशीच चूक केली. बर्न्सने दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये स्लिपमध्ये रोहितचा कॅच सोडला. अशाप्रकारे नशिबाने अक्षरशः रोहितची साथ दिली ज्याचा फायदा करून त्याने आठ वर्षात परदेशातील पहिले शतक ठोकले. 34 वर्षीय खेळाडूने आपला डाव संथपणे सुरु केला आणि केएल राहुल बाद झाल्यावरही त्याने आपला संयमी खेळ सुरूच ठेवला. चेतेश्वर पुजारा इंग्लिश गोलंदाजांवर हल्ला चढवत असताना रोहित काही अंतराने मोठे शॉट्स खेळत राहिला. त्यानंतर रोहितने भारतीय डावाच्या 64व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचून आपले खास 'पहिले' शतक पूर्ण केले.

दरम्यान, 34 वर्षीय खेळाडूने यापूर्वी डावादरम्यान 15,000 आंतरराष्ट्रीय धावाही केल्या. तसेच आज आपल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठला आहे. 2013 मध्ये दोन शतकांसह वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी कारकिर्दीची उल्लेखनीय पद्धतीने सुरुवात करूनही, मधल्या फळीतील विसंगतीमुळे रोहित टेस्ट क्रिकेटमध्ये अपयशी ठरला. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा 2019 मध्ये सलामीवीराच्या नवीन भूमिकेत खेळवण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या शानदार कामगिरीने त्याला पहिल्या WTC आवृत्तीत धावांच्या यादीत आघाडी मिळवून दिली. त्याने 19 डावांमध्ये चार शतक आणि दोन अर्धशतकांसह 1094 धावा चोपल्या.