IND vs ENG 4th Test Day 2: रिषभ पंतने घेतला इंग्लंडचा समाचार, दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाचा स्कोर 294/7; इंग्लंडविरुद्ध 89 धावांची आघाडी

रिषभ पंतने अवघ्या 118 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी केली

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 2: अहमदाबाद (Ahmedabad) येथील भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील चौथ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून यजमान संघाने दिवसाखेर 7 विकेट गमावून 294 धावा केल्या आहेत तर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लिश टीमवर 89 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा सुंदर 60 धावा आणि अक्षर पटेल 11 धावा करून खेळत होते. रिषभ पंतने अवघ्या 118 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकत 101 धावांची खेळी केली आणि भारताचा डाव सावरला. त्यापूर्वी रोहित शर्माने 49 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, इंग्लंड गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण पंतने आपल्या फटकेबाजीने त्यांची लय बिघडली. इंग्लिश टीमसाठी जेम्स अँडरसनने 3 तर बेन स्टोक्स आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. (IND vs ENG 4th Test Day 2: विराट कोहलीचा नकोशा रेकॉर्ड-बुकमध्ये समावेश, अहमदाबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बनले हे प्रमुख रेकॉर्ड)

टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी एक विकेट 24गमवून  धावांवर खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी पाहुणा संघ अवघ्या 200 धावांवर गारद झाल्यानंतर टीम इंडियाचीही भोपळाही न फोडता पहिली विकेट पडली. शुभमन गिल शून्यावर बाद झाल्यावर रोहित आणि पुजाराने संघाचा डाव पुढे नेला. मात्र, इंग्लंड गोलंदाजांनी त्यांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि लागोपाठ मोठे धक्के दिले. पुजारा 17 धावांवर बाद झाल्यावर कर्णधार विराटला स्टोक्सने शून्यावर माघारी धाडलं. त्यानंतर, रोहितने अजिंक्य रहाणेसह डाव सावरला, पण अँडरसनने रहाणेला 27 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर अँडरसनने अजिंक्यला स्टोक्सच्या हाती कॅच आऊट करत यजमानास संघाला चौथा धक्का दिला. रहाणेला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. स्टोक्सने रोहितला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना 49 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. पाच विकेट गमावल्यानंतर पंत आणि अश्विनच्या जोडीने भारताचा डाव सावरला पण संघाचा अनुभवी फिरकीपटू मोठी खेळी करू शकला नाही व आऊट झाला. अश्विनने 2 चौकारांसह 13 धावांची खेळी केली.

अनुभवी खेळाडूंची विकेट गमावल्यावर संघ अडचणीत सापडला होता जेव्हा पंतने सुंदरसह इंग्लंड गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरूवात केली. इंग्लड गोलंदाज वरचढ होत असताना दोंघांनी 113 धावांची भागीदारी करत संघाला आघाडी मिळवून दिली. यादरम्यान, पंतने उत्तुंग षटकार मारत 115 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केलं, मात्र नंतर अँडरसनने त्याचा अडथळा दूर केला. पंत बाद झाल्यावर सुंदरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अर्धशतक पूर्ण केलं. सुंदरच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. यापूर्वी, पहिल्या डावात फलंदाजी करत इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला.