IND vs ENG 3rd Test: लीड्स टेस्ट सामन्यात टीम इंडियाला भारी पडल्या ‘या’ 4 चुका, पहिल्या दिवशीच लिहिला गेला होता पराभव

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने ‘विराटसेने’वर डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाला 4 चुका महागात पडल्या ज्याने पहिल्याच दिवशी आपला पराभव निश्चित केला.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लिश संघाने दिमाखात विजय मिळवला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने ‘विराटसेने’वर डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच यजमान संघाने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाने (Team India) लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडसमोर गुडघे टेकले. आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडला मालिकेत परतण्याची संधी दिली. या सामन्यात टीम इंडियाला 4 चुका महागात पडल्या ज्याने पहिल्याच दिवशी आपला पराभव निश्चित केला. (IND vs ENG 3rd Test: लीड्स कसोटीत भारताचे धुरंधर फेल; इंग्लंडचा डाव आणि 76 धावांनी तगडा विजय, रॉबिन्सनच्या ‘पंच’चा कहर!)

1. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा चुकीचा निर्णय

तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला जो त्यांच्यासाठी घातक ठरला. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात खेळपट्टीने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना खूप मदत केली आणि त्यांनी टीम इंडियाच्या फलंदाजांवर दबाव आणला. कोहलीने मैदानाच्या गेल्या 4 वर्षांच्या विक्रमाकडे दुर्लक्ष केले. या दरम्यान तीन कसोटी खेळण्यात आल्या आणि पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्व सामने गमावले. यापैकी इंग्लंडने दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात त्याला वेस्ट इंडिजकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दरम्यान, तीनही सामन्यांच्या पहिल्या डावात 258, 174 आणि 179 धावा केल्या. म्हणजेच दोनदा संघ 200 धावांचा टप्पाही स्पर्श करू शकले नाहीत.

2. सलामी फलंदाजांची खराब सुरुवात

लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या केएल राहुलला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही तर दुसऱ्या डावात यो 8 धावाच करू शकला. राहुल बाहेर पडताच संपूर्ण मधली फळीही कोलमडली. चेंडूशी ऑफ-साईड चेंडू खेळण्याचा फटका भारतीय फलंदाजांना सहन करावा लागला आणि पहिले पाच फलंदाज यष्टीरक्षक जोस बटलरकडे झेलबाद झाले. रोहित शर्माही काही विशेष करू शकला नाही आणि 19 धावा करून बाद झाला. पण पहिल्या डावाप्रमाणे मधल्या फळीतील खेळाडूंची साथ न मिळाल्याने भारताला चौथ्या दिवशीच प्रभावाचे तोंड पाहावे लागले.

3. भारताच्या मधल्या फळीचे अपयश

गेल्या काही सामन्यांप्रमाणे दुसऱ्या डावात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा अशा धुरंधर फलंदाजांनी सजलेल्या भारताच्या मधल्या फळीचे अपयश संघाला महागात पडले. या फलंदाजांनी इंग्लंड गोलंदाजांच्या शानदार स्विंगसमोर शरणागती पत्करली. जर या तिघांपैकी कोणीही क्रीजवर अधिककाळ तग धरून राहिले असते तर भारताची इतकी वाईट अवस्था झाली नसती.

4. भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी

फलंदाजांनंतर भारताच्या गोलंदाजांनीही बरीच निराशा केली. इंग्लंडने सलामीवीर हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांच्या जोरावर पहिल्या दिवशी इंग्लंडने एकही विकेट न गमावता 120 धावा करून सामन्यात आपली स्थिती मजबूत केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही इंग्लिश फलंदाज विशेषतः कर्णधार जो रूटपुढे भारतीय गोलंदाज हतबल दिसले. परिणामी रूटने मालिकेतील तिसरे शतक झळकावले आणि संघाला सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली.