IND vs ENG 3rd Test Day 4: हेडिंग्ले टेस्टच्या चौथ्या दिवशी काय असेल भारतीय फलंदाजांची योजना, रोहित शर्माने केला खुलासा
सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची योजना काय असेल याचा खुलासा केला. पहिल्या डावाच्या आधारावर भारतीय संघ सध्या 139 धावांनी मागे आहे.
IND vs ENG 3rd Test Day 4: इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी त्यांच्या मागील चुकांमधून धडा घेत धावा काढल्या आणि त्यात ते यशस्वी होताना दिसत आहे. तिसऱ्या दिवसाचा सामना संपल्यानंतर भारताने (India) 2 विकेट्स गमावून 215 धावा केल्या होत्या आणि अजूनही 139 धावांनी पिछाडीवर आहेत ज्याला कमी म्हणता येणार नाही. आता सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची योजना काय असेल याचा खुलासा केला. तिसऱ्या दिवसाखेर चेतेश्वर पुजारा 181 चेंडूंत 91 धावा खेळत होता तर विराट कोहलीने 94 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या आहेत. या दोघांनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली आहे.(IND vs ENG Test: अष्टपैलू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला 'हा' अनोखा विक्रम)
चौथ्या दिवसाची योजना उघड करताना रोहित शर्मा म्हणाला की “पहिल्या डावाच्या आधारावर भारतीय संघ सध्या 139 धावांनी मागे आहे. सर्वप्रथम संघाला हे अंतर कमी करायचे आहे आणि मग आघाडी घेण्याची वेळ आली आहे. पहिले आपण ही रन पूर्णतः कव्हर करण्याची योजना आखली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला हे देखील पाहावे लागेल की किती ओव्हर शिल्लक आहेत आणि आपल्या हातात किती विकेट्स आहेत व मग पुढे जाऊ. आम्ही प्रथम परिस्थितीचे पूर्ण आकलन करू आणि त्यानंतरच पुढील योजना करू.” तसेच भारतीय फलंदाजीबाबत रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले की, टीम इंडियाचे फलंदाज पहिल्या डावात जबाबदार फटके खेळले नाहीत आणि परिणामी संघ 78 धावांवर ऑलआऊट झाला. पण दुसऱ्या डावात आम्ही पहिल्या डावातील चुका दुरुस्त केल्या आहेत. “इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात काही चांगली गोलंदाजी केली, पण आम्ही 78 धावांवर बाद झाल्यास अशी खेळपट्टी नव्हती. पहिल्या डावात आम्ही खराब फलंदाजी केली हे मान्य करायला मला अजिबात संकोच नाही, पण दुसऱ्या डावात आम्ही सुधारलो. यामुळेच या क्षणी आपण या स्थितीत आहोत.”
लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा करून मोठी आघाडी घेतली. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव चांगली गोलंदाजी करत 78 धावांवर गुंडाळला. अशास्थितीत सामन्याचा चौथा दिवस टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.