IND vs ENG 3rd Test: विराट कोहलीच्या कमजोरीचा इंग्लंड गोलंदाजाने केक खुलासा, ‘या’ गेम प्लॅनने घेतली भारतीय कर्णधाराची विकेट

लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑली रॉबिन्सनने इंग्लंडसाठी भारताच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याने सामन्यानंतर सादरीकरणात सांगितले की त्याने कोणत्या योजनेसह भारतीय कर्णधार विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी केली.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test: इंग्लंडने (England) तिसऱ्या कसोटीत भारताचा (India) एक डाव आणि 76 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने भारताला लंच ब्रेकपूर्वी दुसऱ्या डावात गुंडाळले. भारत दुसऱ्या डावात 278 धावाच करू शकला परिणामी इंग्लंडने तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 76 धावांनी जिंकला. ऑली रॉबिन्सनने (Ollie Robinson) इंग्लंडसाठी भारताच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. रॉबिन्सनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने सामन्यानंतर सादरीकरणात सांगितले की त्याने कोणत्या योजनेसह भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध गोलंदाजी केली. रॉबिन्सनने आता 4 कसोटीत 17.65 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या आहेत. (Virat Kohli ने सांगितलं Leeds मधील पराभवाचे खरे कारण, चौथ्या कसोटीत Ashwin याला संधी देण्यावरही केले मोठे भाष्य)

रॉबिन्सनने विराटला पहिले लॉर्ड्स आणि दुसऱ्यांदा हेडिंग्ली येथे पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रॉबिन्सन म्हणाला, “विराटची विकेट काढणे खूप छान होते, जेव्हा त्याने मला ओव्हरमध्ये दोन चौकार मारले. विराटसाठी साधी योजना आहे, चौथा आणि पाचवा स्टंप. या कोनातून अपेक्षित होते की त्याच्या बॅटला किनारा लागेल आणि त्याने तेच केले.” तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एकूण सात विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात रॉबिन्सनने चेंडू विराट कोहलीकडे ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि त्याने तो खेळण्यासाठी बॅट उचलली व चेंडू बॅटच्या टोकाला लागून थेट यष्टीरक्षक जोस बटलरच्या ग्लोव्हमध्ये गेला. दुसरीकडे, 39 वर्षीय दिग्गज जेम्स अँडरसनसोबत गोलंदाजी करण्यावर 27 वर्षीय रॉबिन्सन म्हणाला की, “इंग्लंडसाठी माझ्या पहिल्या विजयात सामनावीर पुरस्कार मिळवणे, प्रामाणिक सांगायचे तर हे स्वप्न आहे. मी आधी येथे गोलंदाजीचा आनंद घेतला, आणि येथील परिस्थिती वापरणे छान आहे, म्हणून मला इथे पाच विकेट्स घेऊन आनंद झाला. जिमीबरोबर गोलंदाजी करणे आणि त्याच्याकडून शिकणे हा एक मोठा सन्मान आहे. यामुळे फक्त माझा खेळ सुधारला आहे. मी शिकत राहतो आणि शक्य तितके चांगले होण्याचा प्रयत्न करतो.”

दरम्यान, केनिंग्टन ओव्हल येथे 2 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघ लंडनला रवाना होतील. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यावर आता मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.