IND vs ENG 2nd ODI 2021: इंग्लंडचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, श्रेयसच्या जागी रिषभ पंतचा समावेश

भारताचे नेतृत्व कर्णधार विराट कोहलीकडे असेल तर इंग्लिश संघाची धुरा उपकर्णधार जोस बटलरला देण्यात आली आहे. नाणेफेक दरम्यान इंग्लिश कर्णधार बटलरने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत.

विराट कोहली आणि जोस बटलर (Photo Credit: PTI, Twitter/englandcricket)

IND vs ENG 2nd ODI 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात आज पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर मालिकेचा दुसरा वनडे सामना आज खेळला जाणार आहे. भारताचे नेतृत्व कर्णधार विराट कोहलीकडे (Virat Kohli) असेल तर इंग्लिश संघाची धुरा उपकर्णधार जोस बटलरला (Jos Buttler) देण्यात आली आहे. पहिल्या वनडे सामन्यात नियमित कर्णधार इयन मॉर्गनला दुखापत झाल्याने त्याला मालिकेच्या उर्वरित दोन्ही सामन्यांतून बाहेर पडावे लागले आहे. आजच्या सामन्यासाठी झालेल्या नाणेफेक दरम्यान इंग्लिश कर्णधार बटलरने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत. (IND vs ENG 2nd ODI 2021 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील पहिला वनडे सामना लाईव्ह कुठे, कधी आणि कसे पाहणार?)

भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी पुन्हा सलामीला येईल, तर केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजीला उतरेल. शिवाय, दुखापतीमुळे मालिकेला मुकलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी रिषभ पंतचा समावेश झाला. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला पंत चौथ्या क्रमांकावर अय्यरची जागा घेईल. दुसरीकडे, इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल झाले आहेत. इयन मॉर्गनच्या जागी डेविड मलानचा समावेश झाला आहेत तर दुखापतीमुळे सॅम बिलिंग्सना आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. बिलिंग्सच्या जागी लियाम लिविंगस्टोनला वनडे पदार्पणाची संधी मिळाली आहे. याशिवाय, मार्क वूडला देखील वगळण्यात आले आहे आणि त्याच्या जागी रीस टोपलीला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज असलेल्या लिविंगस्टोन यापूर्वी इंग्लंडकडून दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे तर भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघातही त्याचा समावेश होता, मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आजचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक ठरणार असेल. टीम इंडिया मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आहे.

असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: जोस बटलर (कॅप्टन/विकेटकीपर), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेविड मलान, मोईन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल रशीद आणि रीस टोपली.



संबंधित बातम्या