Virat Kohli ने सांगितलं Leeds मधील पराभवाचे खरे कारण, चौथ्या कसोटीत Ashwin याला संधी देण्यावरही केले मोठे भाष्य
यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बदलाचे संकेत दिले. इंग्लंडने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यानंतर दबाव आल्याचेही त्याने सांगितले.
ENG vs IND 3rd Test: लीड्समध्ये (Leeds) खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला (Team India) एक डाव आणि 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बदलाचे संकेत दिले. इंग्लंडने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यानंतर दबाव आल्याचेही त्याने सांगितले. या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांवर संपुष्टात आला ज्यानंतर इंग्लंडने (England) 432 धावा केल्या आणि 354 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 278 धावाच करता आल्या. इंग्लंडने आता मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. पराभवानंतर विराट म्हणाला, “आम्ही रोटेशनबद्दल बोलू, एवढ्या मोठ्या दौऱ्यावर आम्ही प्रत्येक खेळाडूकडून सतत 4 कसोटी सामने खेळण्याची अपेक्षा करू शकत नाही.” (IND vs ENG 3rd Test: लीड्स टेस्ट सामन्यात टीम इंडियाला भारी पडल्या ‘या’ 4 चुका, पहिल्या दिवशीच लिहिला गेला होता पराभव)
विराट म्हणाला, “स्कोअर बोर्डमुळेही दबाव होता. आम्हाला माहित होते की जेव्हा आम्ही 80 धावांवर बाद झालो तेव्हा आम्ही पिछाडीवर पडलो होतो. विरोधी संघाने मोठी धावसंख्या उभारली. आम्ही महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि दुसऱ्या दिवसाची वाट बघितली पण आज सकाळी (दिवस 4) इंग्लिश गोलंदाजांकडून चांगला खेळ झाला आणि आमच्यावर दबाव आला.” कर्णधार कोहली पुढे म्हणाला, “आम्ही गोलंदाजांना चांगला प्रतिसाद देऊ शकलो नाही. इंग्लंडमध्ये फलंदाजी कधीही खराब होऊ शकते. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती, पण चेंडूने इंग्लंडची शिस्तीने आम्हाला काही चुका करण्यास भाग पाडली. त्याला सामोरे जाणे कठीण होते. इंग्लंडने फलंदाजी करताना खेळपट्टी फारशी बदलली नाही, त्यामुळे त्यांनी फलंदाजीचा भरपूर फायदा घेतला आणि चांगले निर्णय घेतले. खरे सांगायचे तर, इंग्लंड जिंकण्यासाठी पात्र होता.”
दुसरीकडे, भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला सलग तीन सामन्यात न खेळवल्यामुळे देखील विराट आणि संघ व्यवस्थापनावर टीका केली जात होती. आता 2 सप्टेंबरपासून मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या द ओव्हल मैदानात खेळला जाणणार आहे जिथली खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. पुढच्या सामन्यासाठी संघात फिरकीपटूचा समावेश करण्यावर कोहलीने सांगितले की, "दुसरा फिरकीपटू खेळणे खेळपट्टीवर अवलंबून असेल आणि आम्ही त्यावर नंतर निर्णय घेऊ. सामना पाच दिवस कसा चालेल हे खेळपट्टीच्या ओलाव्यावर अवलंबून आहे.”