IND vs AUS Series: तेंडुलकर-वॉर्न युद्ध ते ईडन गार्डनवर लक्ष्मण-द्रविडचे राज्य; पाहा भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील आठवणीतले सामने

दोन्ही देशांतील क्रिकेट संघाने चाहत्यांना अविस्मरणीय क्षण दिले आहेत काही चांगले तर काही दुसऱ्याच कारणांसाठी. आज आपण पाहणार आहोत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील आठवणीतल्या 'त्या' कसोटी मालिका आणि त्यातील क्षण जे अद्यापही चाहत्यांच्या लक्षात असतील...

IND vs AUS 2020-21 Series: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमध्ये लवकरच वनडे, टी-20 आणि कसोटी मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. 1996 पासून दोन्ही देशातील क्रिकेट संघात होणाऱ्या कसोटी मालिकेला ऍलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर या दोन महान खेळाडूंच्या कामगिरीच्या सन्मानार्थ बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar Trophy) म्हणून संबोधले जाते. भारत-ऑस्ट्रेलिया संघात 1947 पासून आजवर 98 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने 42 आणि भारताने 28 सामने जिंकले आहेत, तर 28 सामने अनिर्णित राहिले आहे. अशाप्रकारे दोन्ही देशांतील क्रिकेट संघाने चाहत्यांना अविस्मरणीय क्षण दिले आहेत काही चांगले तर काही दुसऱ्याच कारणांसाठी. दोन्ही देशांमध्ये आजवर रंगतदार सामने पाहायला मिळाले आहेत. (IND vs AUS 2020-21 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेमध्ये 'या' 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर, आपल्या खेळाने बदलू शकतात मॅचचे चित्र)

आज आपण पाहणार आहोत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील आठवणीतल्या 'त्या' कसोटी मालिका आणि त्यातील क्षण जे अद्यापही चाहत्यांच्या लक्षात असतील...

1. सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न लढाई

1997/98 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या एम.ए चिदंबरम स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात वॉर्नने अवघ्या 4 धावांवर सचिन तेंडुलकरला माघारी धाडलं. वॉर्नने सचिनला आपल्या फिरकी जाळ्यात अडकवत स्लिपमध्ये झेलबाद केलं. त्यानंतर भारताची मधली फळी देखील अपयशी ठरली आणि कांगारू टीमने भारताला 257 धावांवर रोखलं आणि नंतर 328 धावा करत भारतावर 71 धावांची आघाडी घेतली. निर्णायक डावात सचिनने वॉर्नसह ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला आणि 191 चेंडूत 155 धावा फडकावल्या व भारताने आपला डाव 418/4 असा घोषित केला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 348 धावांचे आव्हान होते. मात्र, अनिल कुंबळे-राजू चौहानच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचा डाव 168 धावांवर गुंडाळला आणि 179 धावांनी सामना जिंकला.

2. राहुल द्रविड-व्हीव्हीस लक्ष्मणचा वाजला डंका

कोलकाताच्या इडन गार्डनवर खेळण्यात आलेला हा सामना जगातील सर्व काळातील सर्वोत्कृष्ट सामना होता. क्रिकेटच्या इतिहासात असे फार कमी वेळा झाले आहे की फॉलो-ऑन मिळालेल्या संघाने अखेरीस सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर उभारला. स्टिव्ह वॉ यांनी 110 आणि मॅथ्यू हेडनने 97 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात 171 धावाच करू शकला आणि ऑस्ट्रेलिया संघाला 274 धावांची आघाडी मिळाली. फॉलो ऑन मिळाल्यावरही भारताची स्थिती 115 धावांवर 3 विकेट अशी असताना द्रविड आणि लक्ष्मणच्या जोडीने सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी पूर्ण दिवस फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी 376 धावांची भागीदारी केली ज्यात लक्ष्मणने 281 आणि द्रविडने 180 धावा केल्या व भारताने डाव 7 बाद 657 धावांवर घोषित केला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले आणि यंदा भारतीय गोलंदाजांनी निराश केले नाही. हरभजन सिंहने हॅटट्रिक घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मुश्किलीत टाकले. अखेरीस ऑस्ट्रेलियन संघ फक्त 212 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि भारताने 171 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.

3. मंकीगेट वाद

हरभजन सिंह आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यातील ही घटना क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त घटना म्हटली जाऊ शकते. हरभजनने सायमंड्सला वानर म्हणून संबोधून वांशिक टिप्पणी केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन खेळाडूने केला होता त्यानंतर मॅच रेफरीने भज्जीवर तीन कसोटी सामन्यांसाठी बंदी घातली. कुंबळेच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत दौरा रद्द करण्याची धमकी दिली. अखेर आयसीसीने प्रकरणाची दखल घेतली आणि भज्जीवरील बंदी हटवण्यात आली.

4. रिकी पॉन्टिंगचे दुहेरी शतक व्यर्थ

2003 अ‍ॅडिलेड कसोटीच्या पहिल्या डावात पॉन्टिंगच्या 242 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 556 धावांचा डोंगर उभारला असतानाही ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला. अशास्थितीत द्रविड-लक्ष्मणची जोडी पुन्हा एकदा टीमच्या मदतीसाठी धावली. द्रविडने 446 चेंडूत 233 धावा आणि लक्ष्मणने त्याला साथ देत 148 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांमधील 303 धावांच्या भागीदारीने भारताला 523 धावांपर्यत मजल मारून दिली. मग, अजित आगरकरने पुढाकार घेत 41 धावांवर 6 विकेट काढल्या आणि ऑस्ट्रेलियाला 196 धावांवर रोखले. द्रविडने पुन्हा संयमी डाव खेळला आणि त्याच्या 72 धावांच्या डावाने भारताला चार विकेटने विजय मिळवून दिला.