IND vs AUS 4th Test Day 4: मोहम्मद सिराजचे एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के; लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोर 149/4, टीम इंडियावर 182 धावांची आघाडी
मोहम्मद सिराजने 2 तर शार्दूल ठाकूर, आणि वॉशिंग्टन सुंदरने संघाला पहिल्या सत्रात प्रत्येकी 1-1 यश मिळवून दिले.
IND vs AUS 4th Test Day 4: ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्या डावात 4 विकेट गमावून 149 धावा केल्या आहेत आणि लंचपर्यंत टीम इंडियावर (Team India) दुसऱ्या डावात 182 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 33 धावांच्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात वॉर्नर आणि हॅरिसच्या जोडीने संघाची लीड शंभरी पार नेली. वॉर्नर 48, हॅरिस 38 आणि मार्नस लाबूशेन 25 धावा करून तंबूत परतला. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) 28 धावा आणि कॅमरुन ग्रीन (Cameron Green) 4 धावा करून खेळत होते. मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 2 तर शार्दूल ठाकूर, आणि वॉशिंग्टन सुंदरने संघाला पहिल्या सत्रात प्रत्येकी 1-1 यश मिळवून दिले. गब्बा येथील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या चौथ्या आणि अंतिम सामन्याच्या यजमान संघाच्या पहिल्या डावातील 369 धावांच्या प्रत्युत्तरात शार्दूल आणि सुंदरच्या झुंझार शतकी भागीदारीच्या जोरावर 336 धावांपर्यंत मजल मारली. ज्यामुळे, ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. (IND vs AUS Test 2021: टीम इंडिया 2003 अॅडिलेडमध्ये केलेल्या ‘या’ चमत्काराची करणार का पुनरावृत्ती? Aussies वर टांगती तलवार)
कांगारू संघाने चौथ्या दिवशी बिनबाद 21 धावांपासून सुरुवात केली. वॉर्नर आणि हॅरिसने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दोंघांनी या दरम्यान काही मोठे शॉट्सही खेळली आणि गोलंदाजांना ड्रिंक्स ब्रेकपर्यंत विकेटसाठी संघर्ष करावा लागला. पण, मार्कस हॅरिस शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर 38 धावांवर विकेटच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद होऊन माघारी परतला. हॅरिस पाठोपाठ वॉर्नर देखील माघारी परतला. कांगारू संघाचा अनुभवी ओपनर वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि एलबीडब्ल्यू होत बाद झाला. यामुळे, वॉर्नरचे मालिकेतील पहिले अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले. मोहम्मद सिराजने संघाला तिसरे आणि चौथे यश मिळवून दिले. सिराजने पहिले लाबूशेनला वैयक्तिक 25 धावांवर रोहित शर्माकडे झेलबाद केलं आणि दोन चेंडूनंतर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मॅथ्यू वेडला शून्यावर पॅव्हिलियनमध्ये पाठवलं.
ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यात पहिले फलंदाजी करत लाबूशेनच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 369 धावा केल्या. प्रत्युत्तरात शार्दुल आणि वॉशिंग्टन सुंदरची विक्रमी भागीदारीने संघाचे आव्हान कायम ठेवले बी भारताने पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारली. अशा प्रकारे यजमान संघाला फक्त 33 धावांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे सुंदर आणि शार्दूलने पहिल्यांदा कसोटी सामन्यात फलंदाजी करत संघासाठी सर्वाधिक धावा ठोकल्या. दोंघांनी अर्धशतकी धावसंख्या गाठली. शार्दूलने 67 आणि सुंदरीने 62 धावा केल्या.