IND vs AUS 4th Test 2021: तुला परत मानलं ठाकूर! शार्दूल ठाकूरच्या गब्बा टेस्टमधील निर्णायक खेळीचं विराट कोहलीने मराठमोळ्या अंदाजात कौतुक, पहा Tweet
भारताचा कर्णधार विराट कोहलीने शार्दुलचं मराठीत कौतुक केलं. “तुला परत मानला रे ठाकूर!” विराट म्हणाला.
IND vs AUS 4th Test Day 3: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) गब्बा (Gabba) येथे तिसऱ्या दिवशी भारताचे आघाडी फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर पहिल्यांदा टेस्ट सामन्यात फलंदाजी करणाऱ्या शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) कमालीची खेळी केली आणि संघाची धावसंख्या तीनशे पार नेण्यास निर्णायक भूमिका बजावली. शार्दूलने टेस्ट डेब्यू केलेल्या वॉशिंग्टन सुंदरसोबत (Washington Sundar) भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली. शार्दूलने सर्वाधिक 67 धावा ठोकल्या. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. त्याने 115 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार लगावत अर्धशतक केले. तसेच सुंदरनेदेखील 144 चेंडूत 62 धावा केल्या. भारताचा कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला असला तरी कसोटी सामन्यावर लक्ष ठेवून आहे. शार्दूल आणि सुंदरच्या निर्णायक भागीदारीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) दोंघाचे कौतुक करत पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे त्याने शार्दुलचं मराठीत कौतुक केलं. (IND vs AUS 4th Test Day 3: वॉशिंग्टन सुंदरचा करिष्माई षटकार, नॅथन लायनला खेचलेला ‘no-look’ उत्तुंग षटकार पाहून नक्कीच व्हाल अवाक, पहा Video)
विराटने ट्विटरवर पोस्टमध्ये म्हटले की, “वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर, तुम्ही दोघांनी अतिशय मोक्याच्या वेळी उपयुक्तता सिद्ध केलीत. स्वत:च्या खेळीवर विश्वास ठेवत तुम्ही सामना भारतासाठी पुन्हा जिवंत केलात. टेस्ट सामन्याची हीच खरी मजा आहे. वॉशिंग्टन तू पदार्पणाच्या सामन्यात दमदार कमाल केलीस आणि तुला परत मानला रे ठाकूर!” ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या भारत दौर्याच्या चौथ्या कसोटीच्या तिसर्या दिवसाशी सुंदर आणि शार्दुलच्या जोडीने सध्याच्या भारतीय टेस्ट टीमकडून आश्चर्यकारक कामगिरी सुरूच ठेवली. यापूर्वी, तिसऱ्या टेस्ट सामन्यात हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विनने दुखापतीला झुंज देताना शानदार फलंदाजी केली आणि सामना ड्रॉ करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
कोहलीने शार्दूलच्या वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय वनडे सामन्यात महत्त्वपूर्ण कामिओ खेळीचे कौतुक करण्यासाठी ठाकूरसाठी केलेल्या त्याच्या 2019च्या ट्वीटचा संदर्भ घेतला. "तुला मानला रे ठाकूर" कोहलीने यावेळी शार्दूलसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शन दिलेला फोटो शेअर केला होता.
दरम्यान, सुंदरने सहा चौकार आणि एका षटकारासह 144 चेंडूत 62 धावा केल्या. या जोडीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर संघाने 111.4 ओव्हरमध्ये 336 धावांपर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियाला फक्त 33 धावांची आघाडी मिळाली.