IND vs AUS 4th Test 2021: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाच्या रोमांचक विजयाचा हा ठरला टर्निंग पॉईंट, निर्णायक क्षणी बदलला गियर!

 रंगतदार ठरलेल्या गब्बा टेस्टच्या पहिल्या डावात यजमानास संघाने 369 धावांचा डोंगर उभारला होता. यानंतर टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्यावर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरच्या सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी टर्निंग पॉईंट ठरली ज्याने निर्णायक क्षणी चित्रच बदलले.

भारतीय क्रिकेट संघ, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला अखेर 32 वर्षानंतर पहिल्यांदा ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बामध्ये (Gabba) पराभव स्वीकारावा लागला. अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेच्या चौथ्या आणि निर्णायक सामन्यात अजिंक्य रहाणेच्या 3 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. यापूर्वी या मैदानावर व्हिव्हियन रिचर्ड्सच्या वेस्ट इंडिज संघाने अ‍ॅलन बॉर्डर यांच्या कांगारू संघाला पराभूत केले होते. संघाच्या विजयात शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी अंतिम दिवशी निर्णायक भूमिका बजावली. रंगतदार ठरलेल्या गब्बा टेस्टच्या पहिल्या डावात यजमानास संघाने 369 धावांचा डोंगर उभारला होता. मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 108 धावांची खेळी केली. यानंतर टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्यावर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली ज्याने निर्णायक क्षणी गियर बदलला. (ICC Test Team Rankings: आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची घसरण, टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर)

यजमान संघाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने सुरुवातीला ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या, ज्यामुळे त्यांची स्थिती 6 बाद 186 अशी झाली होती. शुभमन गिलचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्यांना त्याचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. परिणामी, टीम इंडियाने पहिल्या डावात 186 धावांवर 6 विकेट गमावले आणि संघ 250 धावसंख्या पार करू शकणार की नाही असा प्रश्न उपस्थतीत झाला होता. मात्र, टीम इंडिया संकटात असताना कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सुंदर आणि शार्दुलच्या जोडीने कमाल बॅटिंग करत टीम इंडियाचा डाव सावरला. 123 धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी अर्धशतक लगावलं आणि सामन्याचं चित्रच बदलून टाकलं.

दरम्यान टीम इंडियाचा पहिला डाव 336 धावांवर आटोपला. शार्दूल आणि सुंदरने अनुक्रमे 67 आणि 62 धावांची खेळी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला फक्त 33 धावांची आघाडी मिळू शकली. अखेरीस यजमान संघाने विजयासाठी दिलेल्या 328 धावांचा पाठलाग करत शुभमन गिलने 91 धावा केल्या तर रिषभ पंतने नाबाद 89 धावा करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.