IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेन टेस्टच्या दुसर्‍या दिवशी केलेल्या या 2 मोठ्या चुका टीम इंडियावर भारी पडत आहे, वाचा सविस्तर

भारतीय संघाने गोलंदाजी, फिल्डिंग आणि फलंदाजी दोन्ही विभागात निराशाजनक कामगिरी केली. अशा स्थितीत आज आपण या लेखामधून टीम इंडियाने कोणत्या दोन मोठ्या चूका केल्या आहेत ज्या संघावर भारी पडल्या.

भारत-ऑस्ट्रेलिया, गब्बा टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test 2021: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Bordar-Gavaskar Trophy) जिंकण्यासाठी भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात मनोरंजक लढत होत आहे. पहिले फलंदाजी करत कांगारू संघाने मार्नस लाबूशेनचे शतक, कर्णधार टिम पेनचे अर्धशतक आणि मॅथ्यू वेड व कॅमरुन ग्रीनच्या योगदानांमुळे आपल्या पहिल्या डावात 115.2 ओव्हरमध्ये 369 धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरात टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी 2 बाद 62 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं आणि विरोधी संघाला दोन धक्के दिले. शिवाय, बाउन्सी खेळपट्टीवर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले त्यामुळे, यजमान संघाचे पारडे जाड दिसत आहे. भारतीय संघाने गोलंदाजी, फिल्डिंग आणि फलंदाजी दोन्ही विभागात निराशाजनक कामगिरी केली. अशा स्थितीत आज आपण या लेखामधून टीम इंडियाने कोणत्या दोन मोठ्या चूका केल्या आहेत ज्या संघावर भारी पडल्या. (IND vs AUS 4th Test Day 3 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी ब्रिस्बेन टेस्ट लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?)

1. यजमान संघाच्या तळाच्या फलंदाजांना धावा काढून देणे 

मार्नस लाबूशेनचे शतक आणि टिम पेन याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कांगारू संघाने तीनशे धावांपर्यंत मजल मारली. संघाने 8 विकेट्स फक्त 315 धावांवर गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर दोन विकेट्ससाठी भारतीय गोलंदाजांना खूप संघर्ष करावा लागला. शिवाय, त्या कांगारू फलंदाजांनी धावाही काढल्या. अनुभवी खेळाडूंच्या दुखापतीमुळे गोलंदाजी विभाग अननुभवी असल्याने संघाने 2 विकेट्स घेण्यासाठी खूप वेळ लावला ज्यामुळे यजमान संघाने 369 धावांचा डोंगर उभा केला. तळाच्या मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जॉस हेजलवूड यांनी मिळून 55 धावा केल्या.

2. रोहित शर्माचा बेजबाबदार शॉट

ऑस्ट्रेलियाच्या तीनशे पार धावसंख्येच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात काही चांगली झाली नाही. शुभमन गिल अवघ्या 7 धावांवर माघारी परतला. त्यानंतर, रोहित शर्माने चेतेश्वर पुजारासह सावध फलंदाजी करत डाव सावरला. रोहितने पहिल्या डावात उसळी घेणाऱ्या खेळपट्टीचा पूर्णपणे फायदा उचलताना काही आकर्षक फटके सुद्धा खेळत खेळपट्टीवर व्यवस्थित स्थिरावला होता. सिडनी टेस्टप्रमाणे यंदाही रोहितकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. रोहितने 74 चेंडूत 6 चौकार ठोकत 44 धावांची खेळी केली. त्यानंतर, 20व्या ओव्हरमध्ये नॅथन लायनच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. रोहितला त्या क्षणी असा बेजबाबदार फटका मारण्याची काही गरज नव्हती. शिवाय, अनेकांनी रोहितवर असा फटका खेळण्यासाठी टीकाही केली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया अद्याप 307 धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशी, संघाची मदार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर असेल.