IND vs AUS 3rd Test Day 5: रिषभ पंतच्या चौफेर फटकेबाजीने SCG टेस्ट रंगतदार स्थितीत, लंचपर्यंत टीम इंडियाची 205 धावांपर्यंत मजल, विजयासाठी अद्याप 201 धावांची गरज

सिडनीमध्ये पाचव्या दिवसाच्या लंचची घोषणा झाली आहे आणि टीम इंडियाने दुसऱ्या डावात 3 विकेट गमावून 60 ओव्हरमध्ये 206 धावांपर्यंत मजल मारली आहे. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारताला आता 201 धावांची गरज आहे.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test Day 5: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील सिडनी टेस्ट (Sydney Test) मालिकेचा अंतिम दिवसाचा खेळ रंगतदार स्थितीत पोहचला आहे. सिडनीमध्ये पाचव्या दिवसाच्या लंचची घोषणा झाली आहे आणि टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या डावात 3 विकेट गमावून 60 ओव्हरमध्ये 206 धावांपर्यंत मजल मारली आहे. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारताला आता 201 धावांची गरज आहे. दुपारच्या जेवणाची घोषणा झेली तेव्हा रिषभ पंत (Rishabh Pant) नाबाद 73 धावा आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 41 धावा करून खेळत होते. युवा फलंदाज पंतने चौफेर फटकेबाजी करत सामन्यात रंगात आणली आणि टीमच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. दुसरीकडे, पहिल्या सत्रात कांगारू संघाच्या गोलंदाजांना एकच विकेट मिळाली. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेला नॅथन लायनने अवघ्या 4 धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर पहिल्या सत्राखेर गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत राहिले. (Sydney Test Racial Abuse Row: ऑस्ट्रेलियामध्ये मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजीचा हा व्हिडिओ पाहून होईल राग अनावर, पहा स्थानिक प्रेक्षकांनी कशी उडवली खिल्ली)

सिडनी टेस्टच्या अंतिम दिवशी पुजारा आणि रहाणेने 2 बाद 98 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पण दिवसाच्या आपल्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर लायनने टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार रहाणेला मॅथ्यू वेडकडे कॅच आऊट करत संघाला पहिल्या सत्राचे एकमात्र यश मिळवून दिले. त्यानंतर, हनुमा विहारीच्या पुढे पहिल्या डावात दुखापतग्रस्त झालेला पंत मैदानावर फलंदाजीला आला. पंतने पहिल्या डावातील आपली आक्रमक शैली कायम ठेवली आणि मैदानावर चौफेर फटकेबाजी करत 64 चेंडूत अर्धशतकी धावसंख्या गाठली. पुजारा संथ खेळी करत असताना पंतने आपल्या अर्धशतकी खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार खेचत कांगारू गोलंदाजांवर दबाव बनवला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारीने संघाच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. यापूर्वी टीमसाठी दुसऱ्या डावात रोहित शर्माने 52 धावांची खेळी केली होती. भारतीय संघाने यापूर्वी सिडनी कसोटीत 1978 मध्ये बिशन सिंह बेदी यांच्या नेतृत्वात विजय मिळवला होता.

दरम्यान, पहिल्या डावात कांगारू संघाने पहिले फलंदाजी करत 338 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियाला पहिल्या डावात 244 धावांवर गुंडाळलं व 94 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर यजमान संघाने चौथ्या दिवशी 312/6 धावसंख्येवर दुसरा डाव घोषित करत भारतीय संघाला 407 धावांचं लक्ष्य दिलं.