IND vs AUS 3rd Test 2021: रिषभ पंतचा तडाखा, विहारी-अश्विनच्या चिवट फलंदाजीने भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी सिडनी टेस्ट ड्रॉ

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 5 विकेट गमावून 334 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना अनिर्णित सुटला. यासह चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test 2021: सिडनी टेस्ट (Sydney Test) मॅचच्या अंतिम दिवसाचा खेळ नुकताच संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने (Australia) दिलेल्या 407 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने (Team India) 5 विकेट गमावून 334 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना अनिर्णित सुटला. यासह चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर (Border-Gavaskar Trophy) मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. अ‍ॅडिलेड (Adelaide) येथे कांगारू संघाने रोमांचक 8 विकेटने विजय मिळवला तर भारतीय संघाने मेलबर्नच्या (Melbourne) बॉक्सिंग डे टेस्ट 8 विकेटने जिंकत जबरदस्त कमबॅक केलं आणि मालिकेत बरोबरी साधली. कांगारू संघाने दिलेल्या तगड्या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात भारताच्या रिषभ पंतने तडाखेबाज खेळी केली. पंतने दुसऱ्या डावात संघासाठी सर्वाधिक 97 धावा केल्या तर पुजाराने 77 धावांची संयमी खेळी केली. यापूर्वी, रोहित शर्मा 52 धावा करून परतला, तर आर अश्विन नाबाद 39 धावा आणि विहारी नाबाद 23 धावा करून परतले. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 2 तर पॅट कमिन्सला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 3rd Test 2021: रिषभ पंतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत नावावर केले दोन ‘मोठे’ विक्रम; चेतेश्वर पुजारा पार केली ‘सहा हजारी’)

भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला, पण त्यानंतर पंतने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याने सुरूवातीला सावध खेळ केला, पण नंतर त्याने हेतू स्पष्ट करत आक्रमक फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने 12 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी करत 118 चेंडूमध्ये 97 धावा कुटल्या. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील 205 चेंडूत 77 धावा करूनत्रिफळाचीत माघारी परतला. यानंतर विहारी फलंदाजीत अस्वस्थ असल्याने अश्विनने पुढाकार घेतला आणि धावंक गती वाढवण्याची जबाबदारी सांभाळली. मात्र, नंतर विहारी काही चौकार लगावले आणि अश्विनसह 247 चेंडूत अर्धशतकी भागीदारीने संघाला सामना अनिर्णीत करण्यात मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, सिडनी येथील सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करताना 338 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 244 धावांवर संपुष्टात आला आणि यजमान संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 94 धावांची आघाडी मिळाली. कांगारू संघासाठी पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 131 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात स्मिथसह संघाच्या अन्य दोन खेळाडूंनी अर्धशतकी डाव खेळला. कॅमरुन ग्रीनने पहिले अर्धशतक ठोकत सर्वाधिक 84 धावा केल्या तर मार्नस लाबूशेनने 73 धावांचे योगदान दिले. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाने 312 धावा करत डाव घोषित केला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 407 धावांचं तगडं आव्हान मिळालं.