IND vs AUS 3rd ODI: स्टिव्ह स्मिथ याचे झुंजार शतक, ऑस्ट्रेलियाचे टीम इंडियासमोर 287 धावांचे लक्ष्य
बेंगळुरूमधील आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी भारताला 287 धावा करण्याचे ऑस्ट्रेलियाने लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने एकाकी झुंज देत शतकी कामगिरी केली. स्मिथ 131 धावा करून बाद झाला.
टीम इंडिया (India) विरुद्ध एम. चिन्नास्वामी स्टेडियममधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने (Australia) निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 बाद 286 धावा केल्या. बेंगळुरूमधील आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी भारताला 287 धावा करण्याचे ऑस्ट्रेलियाने लक्ष्य दिले आहे. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी एकूण 27 अतिरिक्त धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाकडून माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने एकाकी झुंज देत शतकी कामगिरी केली. स्मिथ 131 धावा करून बाद झाला. मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) याने स्मिथला चौथ्या स्थानावर येत चांगली साथ दिली. लाबूशेन 54 धावा करून बाद झाला. स्मिथ-लाबूशेनने तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली आणि संघाला मुश्किल स्थितीतून बाहेर काढले. अॅश्टन अगर 11, जोश हेजलवुड 1 धाव करून नाबाद परतले. आजच्या मालिकेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाकडून मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने 4, रवींद्र जडेजाने 2, तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिका खिशात घालेल. (IND vs AUS 3rd ODI: बेंगळुरूमध्ये दिसला 'उडता' विराट, मार्नस लाबूशेन चा कॅच पकडल्यावर किंग कोहलीने केले रॉबिन उथप्पाच्या 'कॅप सेलिब्रेशन' चे केले अनुकरण, पाहा Video)
मालिकेच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. सलामी फलंदाज डेविड वॉर्नर 3 धावा करून माघारी परतला. कर्णधार आरोन फिंच 26 चेंडूत 19 धावा करून धावबाद झाला. स्मिथसह खेळपट्टीवर झालेल्या गैरसमजामुळे फिंचला आपला विकेट गमवावी लागली. मात्र, त्यानंतर स्मिथ आणि लाबूशेनच्या साथीने डाव हाताळला आणि स्कोअर 100 पर्यंत पोहचवला. त्यांनतर जडेजाने लाबूशेनला बाद करून धोकादायक ठरणारी ही भागीदारी मोडली आणि भारतीय संघाला दिलासा दिला. याच ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर त्याने मिशेल स्टार्कला बाद केले. त्यानंतर अॅलेक्स कॅरी 35 धावा करुन पॅव्हिलियनमध्ये परतला. स्मिथने 117 चेंडूंत 9 वे वनडे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले.
दरम्यान, आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये केन रिचर्डसनच्या जागी जोश हेजलवुडला स्थान देण्यात आले आहे, तर भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. पण, ऑस्ट्रेलियाच्या डावात फिल्डिंग करताना सलामी फलंदाज शिखर धवनला डाव्या खांद्याला दुखापत झाली.