Ajinkya Rahane Run-Out: रवींद्र जडेजाच्या चुकीने रनआऊट झाल्यावर अजिंक्य रहाणेने आपल्या कृतीने पुन्हा जिंकून घेतली सर्वांची मनं, पहा व्हायरल Photo
एमसीजीमध्ये रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे रहाणे धावबाद झाला, परंतु यानंतर टीम इंडिया प्रभारी कर्णधाराने जे केले ते खरंच कौतुकास्पद होतं.
IND vs AUS 2nd Test Day 3: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे खेळल्या जाणार्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या तिसर्या दिवशी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) दुर्दैवी रनआऊटमुळे कॅप्टन्स इनिंग्सनंतर पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले. एमसीजीमध्ये (MCG) रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चुकीमुळे रहाणे धावबाद झाला, परंतु यानंतर टीम इंडिया प्रभारी कर्णधाराने जे केले ते खरंच कौतुकास्पद होतं. आऊट होऊन माघारी परताना रहाणेने जडेजाच्या प्रति दाखवलेल्या या जेश्चरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 5 बाद277 धावांवर भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु केला. रहाणेने नाबाद 104 धावांवर खेळत असताना मोठ्या खेळीची अपेक्षाही जागवली, पण 100व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मार्नस लाबूशेनने त्याला माघारी धाडलं. जडेजाला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी दोन धाव हवी असताना लाबूशेनच्या थ्रोने रहाणे धावबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. (IND vs AUS 2nd Test Day 3: अजिंक्य रहाणे-रवींद्र जडेजा यांची शतकी भागीदारी, भारताचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध 131 धावांची आघाडी)
जडेजाने नॅथन लायनचा चेंडू शॉर्ट कव्हरकडे मारला आणि रहाणेला धाव घेण्यासाठी कॉल दिला, पण चेंडू तोवर लाबूशेनच्या हातात होता जो त्याने विकेटकीपर-कर्णधार टिम पेन याच्याकडे थ्रो केला आणि रहाणे थोडक्यात रनआऊट झाला. धाव घेण्यासाठी आपण घाई केल्याचे जडेजाला कळले आणि त्याने निराशेने मान खाली घातली. पण, मैदानाबाहेर जाताना रहाणे जडेजाकडे गेला आणि त्याला संतवाना दिली. रहाणे आणि जडेजा यांच्यातील या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांची मने जिंकत आहेत. 223 चेंडूंत 12 चौकारांसह 112 धावांची शानदार खेळी खेळत रहाणे पॅव्हेलियनमध्ये परतला. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, यापूर्वी अॅडलेड ओव्हलमधील पहिल्या कसोटी सामन्यात रहाणेच्या चुकीमुळे कर्णधार विराट कोहली धावबाद झाला होता. आणि आता जडेजाच्या चुकीमुळे रहाणे धावबाद झाला तेव्हा तो जडेजाच्या भावना समजून घेत रहाणे त्याला सांत्वन देत असल्याचे दिसून आला.
जाडेजाला प्रोत्साहन देताना
उत्कृष्ट जेश्चर
नि: स्वार्थ
एक नेता
दरम्यान, रहाणे बाद झाल्यानंतर पहिल्या सत्रात जडेजा देखील 57 धावांची खेळीनंतर बाद झाला. मिचेल स्टार्कने जडेजाला पॅट कमिन्सकडे झेलबाद केले. जडेजा 159 चेंडूत 3 चौकारांसह 57 धावा करून पॅवेलियनमध्ये परतला. हे जडेजाचे 15 वे कसोटी अर्धशतक होते तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग दुसरे अर्धशतक ठरले. तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात कांगारू संघाला 195 धावांवर ढेर केलं. अॅडिलेडमधील पहिला सामना आठ विकेट्सने गमावल्यामुळे भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.