IND vs AUS 2nd Test 2020: बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात अजिंक्य रहाणेसह 'या' खेळाडूनेही केली शतकी खेळी, पुन्हा अशाच डावाची चाहत्यांना अपेक्षा
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातही रहाणे आणि पुजाराने शतक झळकावले होते आणि पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांकडून अशाच डावाची अपेक्षा असेल.
IND vs AUS 2nd Test 2020: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्यात दौऱ्यावरील टीम इंडियावर (Team India) खूप दबाव असेल. कसोटी मालिकेत आपले आव्हान राखण्यासाठी भारतीय संघाने हा सामना जिंकणे फार महत्वाचे आहे. मेलबर्नमध्ये (Melbourne) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात टीम इंडियाऑस्ट्रेलियाविरुद्ध 100वा कसोटी सामना असेल. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे स्वत: कर्णधार म्हणून आणि टीम इंडियाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार म्हणून रहाणेवर दबाव असेलच मात्र फलंदाज म्हणून त्याच्यावरही त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. रहाणे हा एक चांगला कसोटी फलंदाज आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खेळपट्टीवर धावा करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातही अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2014मध्ये शतक झळकावले होते. त्या सामन्यात रहाणेने 147 धावा केल्या होत्या. (IND vs AUS 2020-21: विराट कोहलीने मायदेशी रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला दिला खास संदेश, पहा Video)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताकडून केवळ 5 फलंदाजांनी शतकं ठोकली आहेत. सध्याच्या भारतीय संघात रहाणे वगळता चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात शतकी खेळी केली आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांकडून अशाच डावाची अपेक्षा असेल. 2018 मध्ये पुजाराने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात 106 धावांची खेळी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय फलंदाजाकडे कांगारू संघाविरूद्ध अशी कामगिरी करण्याची संधी आहे. शिवाय, भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100वा टेस्ट सामना असल्याने शतक केल्यास ते आणखी खास ठरेल.
दरम्यान, 1999मध्ये पहिल्यांदा सचिन तेंडुलकरने बॉक्सिंग डे मॅचमध्ये पहिले शतक झळकावले होते आणि 116 धावांचा डाव खेळला होता. तेंडुलकरनंतर 2003 मध्ये कामगिरी वीरेंद्र सेहवागने केली आणि 195 धावा केल्या. सेहवागनंतर 2014 मध्ये रहाणे आणि टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीनेही बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात कांगारू संघाविरुद्ध शतक झळकावले आणि 169 धावा केल्या.