IND vs AUS 1st Test 2020: पिंक-बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजयीरथ सुरूच, अ‍ॅडिलेड कसोटीत Aussie संघाची 'विराटसेने'वर मात

पिंक-बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने आपला वरचष्मा कायम ठेवला आणि सलग आठवा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी जो बर्न्सने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. कमिन्स आणि हेझलवूड संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तिसऱ्या दिवशी हेझलवूडने 5 तर कमिन्सने 4 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: Instagram/cricketaustralia)

IND vs AUS 1st Test 2020: पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) आपला वरचष्मा कायम ठेवला आणि भारतावर 8 विकेटने मात करत सलग आठवा पिंक-बॉल विजय मिळवला. जोश हेझलवूड (Josh Hazlewood) आणि पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) भेदक माऱ्याने भारतीय संघाला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात निच्चांकी 36 धावसंख्येवर रोखलं, ज्यामुळे संघाला आपली आघाडी वाढवता आली नाही आणि विजयासाठी फक्त 90 धावांचे लक्ष्य मिळाले जे यजमान संघाने 2 विकेट न गमावता गाठले. यासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 244 धावा करणाऱ्या भारताने शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर संपुष्टात आणला आणि 53 धावांची आघाडी घेतली, मात्र तिसऱ्या दिवशी भारताचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियासाठी जो बर्न्स (Joe Burns) आणि स्टिव्ह स्मिथ नाबाद परतले. वेडने 33 धावा तर बर्न्सने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. कमिन्स आणि हेझलवूड संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हेझलवूडने 5 तर कमिन्सने 4 विकेट घेतल्या. (IND vs AUS 1st Test 2020: टीम इंडियाने लाज काढली! टेस्ट क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्येची केली नोंद, रवि शास्त्री, विराट कोहलीवर नेटकऱ्यांचा निशाणा)

पहिल्या डावात 53 धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची दुसऱ्या डावात कमिन्स आणि हेझलवूड यांनी भंबेरी उडवली. भारताचा दुसरा डाव 9 बाद 36 वर संपुष्टात आला. शिवाय, एकही भारतीय फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करू शकला नाही. मयंक अग्रवालने सर्वाधिक 9 तर हनुमा विहारीने 8 धावा केल्या. मोहम्मद शमील फलंदाजी करत असताना कमिन्सचा चेंडू लागल्याने दुखापत झाली ज्यामुळे तो पुढे फलंदाजी करु शकला नाही. भारताने दिलेले 90 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन सलामी जोडीने सहज गाठले आणि दिवस/रात्र कसोटीतील आपले वर्चस्व कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाचा हा एकूण आठवा पिंक-बॉल सामना असून त्यांनी मागील सर्व सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया दिवस/रात्र कसोटीतील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. शिवाय, भारताचा पिंक-बॉलमधील हा पहिला पराभव ठरला.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात 244 धावा केल्या होत्या. सलामी जोडी फ्लॉप झाल्यावर चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या कामगिरीने संघाचा डाव सावरला, मात्र दुसऱ्या डावात संघाचे सर्व धुरंधर स्वस्तात माघारी परतले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार टिम पेन याने सर्वाधिक नाबाद 73 धावा केल्या तर मार्नस लाबूशेनने 47 धावांची संयमी खेळी केली. पुढील सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉक्सिंग डे सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now