आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी सौरव गांगुली चा Team India ला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला
इंग्लंडमधील रोज बाऊल क्रिकेट ग्राऊंड येथे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यापूर्वी टॉस जिंकल्यास काय निर्णय घ्यावा, याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
आयसीसी आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेचा अंतिम सामना (ICC World Test Championship 2021 Final) आज भारत आणि न्युझीलँडमध्ये (India Vs New Zealand) रंगणार आहे. इंग्लंडमधील रोज बाऊल क्रिकेट ग्राऊंड (Rose Bowl Cricket Ground) येथे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे. 2019 पासून सुरु झालेल्या या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि न्युझीलँड यांनी अंगतालिकेत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर आज होणाऱ्या अंतिम सामन्याची संपूर्ण जगभरात उत्सुकता आहे. दरम्यान, आजच्या सामन्यापूर्वी टॉस जिंकल्यास काय निर्णय घ्यावा, याबद्दल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांने महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
"भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घ्यावा. कारण ढगाळ वातावरण असलं तरी परदेश दौऱ्यात प्रथम फलंदाजी करणे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरलं आहे," असं सौरव गांगुली याने म्हटलं आहे. इंडिया टुडेशी बोलताना गांगुली म्हणाला की, "तुम्ही जर रेकॉर्ड पाहिले तर जेव्हा भारताने प्रथम फलंदाजी केली आहे तेव्हा सामने जिंकले आहेत. परंतु, प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला प्रेशर घ्यायचं की चौथ्या डावापर्यंत थांबायचं, हा तुमच्या निवडीचा प्रश्न आहे."
"अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची कामगिरी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या दोघांनी कमीत कमी 20 ओव्हर बॅटिंग करुन चांगली सुरुवात दिल्यास चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना धावांचा डोंगर उभा करण्यास अधिक मदत होईल. सध्या न्युझीलँडची टीम ही गेल्या 30-35 वर्षातील सर्वोत्कृष्ट टीम आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये त्यांनी टीम साऊथी आणि केन विलियमसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्यांना इंग्लंडला मात दिली. अशा आत्मविश्वासाने भरलेल्या न्युझीलंड टीमला सहज हरवणे सोपे नाही," असंही गांगुली म्हणाला.
दरम्यान, काल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघ जाहीर झाला. यात विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शामी या खेळाडूंचा समावेश आहे.