ICC U19 World Cup: न्यूझीलंडला पराभूत करून बांग्लादेश प्रथमच फायनलमध्ये; भारताशी असेल अंतिम सामना
गुरुवारी दुसर्या सुपर लीगच्या उपांत्य फेरीत बांगलादेशच्या संघाने, न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत
अंडर 19 विश्वचषक 2020 (ICC U19 World Cup) चा अंतिम सामना भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात होणार आहे. गुरुवारी दुसर्या सुपर लीगच्या उपांत्य फेरीत बांग्लादेशच्या संघाने, न्यूझीलंडला (Newzeland) 6 विकेट्सने पराभूत करून प्रथमच अंतिम फेरी गाठली. आता रविवारी (9 फेब्रुवारी) त्यांचा सामना पोटचेफ्स्ट्रूममध्ये भारताशी होणार आहे.
अंडर 19 विश्वचषकातील पहिल्या सुपर लीग उपांत्य सामन्यात भारताने, त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 10 गडी राखून पराभूत केले. यासह भारताने सातत्याने अंडर 19 विश्वचषकात पाकिस्तानच्या आव्हानाला पराभूत करून, सातव्यांदा फायनलमध्ये जागा मिळवली.
टॉस गमावल्यानंतर आणि प्रथम खेळल्यानंतर न्यूझीलंडचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी 211/8 च्या स्कोअरवर किवींना रोखले. यानंतर बांगला संघाने 44.1 षटकांत 215/4 धावा करुन विजयाचे लक्ष्य गाठले. बांग्लादेशच्या या विजयात महमूदुल हसन जॉयने 100 धावा केल्या. 127 चेंडूंच्या डावात त्याने 13 चौकार ठोकले आणि तो सामनावीर ठरला.
व्हीलर ग्रीनॅलने न्यूझीलंडला नाबाद 75 धावांची खेळी करत कसेतरी 200 पार नेले. त्याने-83 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याच्याशिवाय निकोलस लिडस्टोनने 44 धावांचे योगदान दिले. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावताना, किवी संघाला मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. शोरफुल इस्लामने तीन गडी बाद केले. शमीम हुसेन आणि हसन मुराद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. (हेही वाचा: बुशफायर चॅरिटी मॅच झाली Reschedule; सिडनीऐवजी 'या' ठिकाणी खेळला जाणार सामना, रिकी पॉन्टिंग-अॅडम गिलक्रिस्ट चे संघ येणार आमने-सामने)
विजयासाठी बांग्लादेशला 212 धावांचे सोपे लक्ष्य होते. डाव सुरू करण्यासाठी आलेल्या सलामीवीर फलंदाज परवेझ हुसेन (14) आणि तंजीद हसन (03) यांनी लवकरच विकेट गमावल्या. तौहीदने 40 धावा करुन संघाला काही आधार दिला. यानंतर मधल्या फळीतील फलंदाज महमूदुल हसन आणि शहादत हुसेन यांनी मिळून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.