R Ashwin On WTC Final 2023: 'मला खेळायचे होते...', डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल अश्विनने मौन सोडले; सांगितले संपूर्ण सत्य
त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो रविचंद्रन अश्विनसारख्या (Ravichandran Ashwin) नंबर वन गोलंदाजाला संघात स्थान न मिळणे. अश्विनला स्थान न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2023) भारतीय संघाला 209 धावांनी निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो रविचंद्रन अश्विनसारख्या (Ravichandran Ashwin) नंबर वन गोलंदाजाला संघात स्थान न मिळणे. अश्विनला स्थान न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पण सगळ्यांनाच वाट होते की अश्विन स्वतः यावर काय बोलणार? आता टीम इंडियाच्या स्टार स्पिनरनेही यावर मौन तोडत आपली प्रतिक्रिया देताना निराशा व्यक्त केली आहे.
सामना सुरू होण्याआधीच माहित होते की...
2021 साली इंग्लंडच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध फक्त अश्विनच प्रभावी गोलंदाज ठरला होता. त्याने चार विकेट्सही घेतल्या. मात्र त्यानंतर झालेल्या कसोटी मालिकेत तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने त्याला संधी दिली नाही. तिथून चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज अशी मानसिकता घेऊन संघ इंग्लंडला जाणार हे बहुधा त्याच्या मनात स्पष्ट झाले होते. त्यामुळेच कदाचित त्याला सामना सुरू होण्याआधीच माहित असेल की तो हा विजेतेपदाचा सामना खेळू शकणार नाही. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी याबाबतची संपूर्ण हकीकत सांगितली आहे. (हे देखील वाचा: Indian Test Captain: रोहित शर्माच्या जागी 'हे' अनुभवी खेळाडू आहे कसोटी कर्णधारपदाचे दावेदार, पाहा यादीत कोणाचा आहे समावेश)
'मला खेळायचे होते...'
या मुलाखतीत अश्विनने सांगितले की, मला या अंतिम सामन्यात नक्कीच खेळायचे होते. कारण संघाला इथे आणण्यात माझाही हातभार आहे. गेल्या फायनलमध्येही मी चार विकेट घेतल्या होत्या. 2018-19 सालापासून परदेशातही माझी कामगिरी चांगली आहे. मी सध्या खेळू शकलो नाही आणि विजेतेपदही मिळवू शकलो नाही. मी या निर्णयाकडे प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या दृष्टिकोनातून पाहत आहे आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 2021 मध्ये जेव्हा आम्ही इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा संघाने येथे फक्त चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज यशस्वी होईल असे ठरवले होते. त्यामुळे कदाचित सामना सुरू होण्याच्या 48 तास आधी मला खेळण्याची संधी मिळणार नाही हे माहीत होते.
WTC 2021-23 मध्ये अश्विनची कामगिरी कशी होती?
रविचंद्रन अश्विन डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या चक्रात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. एकूणच, तो नॅथन लिऑन आणि कागिसो रबाडा यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने 13 सामन्यात एकूण 61 विकेट घेतल्या. तरीही हा खेळाडू अंतिम सामन्यात संघाचा भाग नव्हता. हे जाणून प्रत्येक क्रिकेटच्या जाणकाराला आश्चर्य वाटेल. टीम इंडियाच्या पराभवाचे हे सर्वात मोठे कारण होते. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली या दिग्गजांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. यावर अश्विनने असेही सांगितले की, त्याला खेळावे असे वाटले हे जाणून बरे वाटले. पण तो खेळू शकला नाही आणि टीम इंडियालाही विजेतेपद मिळवता आले नाही.