SL vs PAK 2nd Test: बाबर आझमलाही पाकचा लाजिरवाणा पराभव वाचवता आला नाही, श्रीलंकेने मालिका बरोबरीत सोडवली
पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) सर्वाधिक 81 धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्धची (SL vs Pak) दोन कसोटी (Test Match) सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. पहिल्या कसोटीत चार विकेट्सनी पराभव पत्करावा लागल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन करत पाकिस्तानचा चार धावांत पराभव केला. पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 261 धावांवर आटोपला आणि त्यामुळे श्रीलंकेने हा सामना 246 धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात प्रभात जयसूर्याने (Prabhat Jayasuriya) पाच तर रमेश मेंडिसने (Ramesh Mendis) चार बळी घेतले. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) सर्वाधिक 81 धावांचे योगदान दिले.
खराब प्रकाशामुळे सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ वेळेआधीच रद्द करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानने एका विकेटवर 89 धावा केल्या होत्या. इमाम-उल-हक आणि बाबर आझम अजूनही क्रीजवर होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानने लागोपाठ विकेट गमावल्या आणि श्रीलंकेने त्यांना सामन्यात परतण्याची संधी दिली नाही. इमाम-उल-हक 49 धावांवर बाद झाला, त्यामुळे पाकिस्तानने 97 धावांवर आपली दुसरी विकेट गमावली.
बाबर आणि मोहम्मद रिझवानने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या 176 धावांपर्यंत नेली, मात्र 37 धावा करून रिझवान प्रभात जयसूर्याचा बळी ठरला. यानंतर पाकिस्तानच्या एकापाठोपाठ विकेट पडत होत्या. फवाद आलम अवघ्या एका धावेवर बाद झाला, तर आगा सलमान चार धावा करून बाद झाला. बाबर आझमच्या रूपाने पाकिस्तानला सहावा धक्का बसला. यासिर शाहने 25 चेंडूत 27 धावा केल्या, पण लक्ष्य इतके मोठे होते की त्याच्या दबावाखाली पाकिस्तानचा दुसरा डाव गडगडला.