England Beat Pakistan 1st Test 2024: पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून पाकिस्तानवर 1 डाव आणि 47 धावांनी विजय, हॅरी ब्रुक ठरला सामनावीर
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 500 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत होणारी पाकिस्तानही पहिलीच टीम ठरली आहे.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तान दौऱ्याची सुरुवात विजयाने केली असून इंग्लंडने पाक विरोधातील पहिला सामना पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात जिंकला. इंग्लंडने पाकिस्तानचा 1 डाव आणि 47 धावांनी पराभव केला आहे. गेल्या 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान अशा पद्धतीने सामना गमावणारी पहिलीच टीम ठरली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा अपमानास्पद पद्धतीने कोणत्याच संघाचा पराभव झाला नव्हता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 500 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत होणारी पाकिस्तानही पहिलीच टीम ठरली आहे. (हेही वाचा - Pakistan vs England 1st Test 2024 Day 5 Live Streaming: पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या वाटेवर; विजयापासून इंग्लंड 4 विकेट्स दूर; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या)
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 07 ऑक्टोबरपासून मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात होता. चौथ्या दिवशी इंग्लंड संघाचा पहिला डाव 150 षटकांत 7 गडी गमावून 823 धावांवर घोषित केला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने संघाकडून सर्वाधिक 317 धावांची खेळी खेळली. हॅरी ब्रूकने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात पहिले त्रिशतक पूर्ण केले. हॅरी ब्रूक 322 चेंडूत 29 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 317 धावाकरुन परतला होता. तर जो रुट 262 धावांची शानदार खेळी खेळून बाद झाला होता. या दोघांच्या या शानदार खेळीनंतर इंग्लंडचा विजयाचा मार्ग मोकळा केला होता.
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानने पहिल्या डावात 149 षटकात 556 धावा करत पाकिस्तानचा संपूर्ण संघ सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूदने 151 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली, तर सलमान अली आघानेही 104 धावा करत संघाला मजबूत केले. याशिवाय अब्दुल्ला शफीक (102) आणि सौद शकील (82) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले होते. दरम्यान या सामन्यात पाकिस्तानने चांगली सुरुवात केल्यानंतरही त्यांना पराभवाला सामोरे जावं लागले आहे.