IPL Auction 2023: आयपीएल लिलावासाठी काही दिवस आहेत बाकी, 'हे' दिग्गज खेळाडू लिलावात मोडू शकतात विक्रम
यावेळी आयपीएल लिलावात बेन स्टोक्स, सॅम करण, केन विल्यमसन यांसारखे अनेक परदेशी खेळाडू लिलावात उतरणार आहेत.
IPL Auction 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोची (Kochi) येथे लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जगभरातून 991 खेळाडूंनी लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र अंतिम यादीत 405 खेळाडू आहेत. या 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 बाहेरचे आहेत. पुढील आयपीएलसाठी, 87 स्लॉट रिक्त आहेत, ते भरण्यासाठी 405 खेळाडू बोली लावतील. यावेळी आयपीएल लिलावात बेन स्टोक्स, सॅम करण, केन विल्यमसन यांसारखे अनेक परदेशी खेळाडू लिलावात उतरणार आहेत. या मिनी लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव होणार आहे. पण काही खेळाडू असे आहेत जे यावेळी लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात.
बेन स्टोक्स उत्कृष्ट फॉर्ममध्ये
आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात, सर्व फ्रँचायझी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा त्यांच्या संघात समावेश करू इच्छितात. जुनी फ्रेंचाइजी राजस्थान रॉयल्सही त्याच्यावर सट्टा लावू शकते. याशिवाय चन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझी बेन स्टोक्सला विकत घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतील. सध्या बेन स्टोक्स उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच त्याने आपल्या संघाला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
लागु शकते सर्वाधिक बोली
याआधी 2019 मध्ये देखील बेन स्टोक्सने आपल्या संघाला 50 षटकांचा विश्वचषक जिंकून दिला होता. फलंदाजीसोबतच बेन स्टोक्स गोलंदाजीतही कमाल करतो. त्यामुळे सर्व फ्रँचायझी त्याच्यावर लक्ष ठेवून असतील. आयपीएलमध्ये अष्टपैलू बेन स्टोक्सने आतापर्यंत 43 सामने खेळले असून त्यात त्याने 920 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमध्ये 2 शतकेही झळकावली आहेत. यावेळी लिलावात बेन स्टोक्सला सर्वाधिक बोली लागू शकते. (हे देखील वाचा: IPL Auction 2023: आयपीएल लिलावात अफगाणिस्तानचा 15 वर्षीय अल्ला मोहम्मद सर्वात तरुण खेळाडू ठरला)
या खेळाडूंवरही पडेल पैशांचा पाऊस
बेन स्टोक्स व्यतिरिक्त, आयपीएल 2023 च्या लिलावात, बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसन, इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू सॅम करन, सिकंदर रझा, कॅमेरॉन ग्रीन, जेसन होल्डर आणि ओडियन स्मिथ हे खेळाडू आहेत ज्यांच्यावर मिनी-लिलावादरम्यान पैशांचा पाऊस पडू शकतो. हे सर्व खेळाडू अष्टपैलू आहेत आणि त्यांच्यात एकहाती सामने जिंकण्याची क्षमता आहे. कॅमेरून ग्रीन आणि सिकंदर रझा आयपीएलमध्ये नवीन असतील पण गेल्या काही काळापासून ते उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहेत. यावेळच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडे खेळाडू म्हणून विकले जाणारे हे खेळाडू आहेत. सर्वांच्या नजरा या सात खेळाडूंवर असतील.