CSK vs SRH, IPL 2020: 19 वर्षीय प्रियम गर्गने ठोकले पहिले आयपीएल अर्धशतक! हैदराबादने CSK ला दिला 165 धावांचे आव्हान

हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांचे फलंदाज अपयशी ठरले आणि टीमने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164 धावा करून सीएसकेसमोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले.

प्रियम गर्ग आणि अभिषेक नायर (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सीजनचा 14वा मॅच आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) दरम्यान दुबईमध्ये खेळला जात आहे. हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि टीमने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164 धावा करून सीएसकेसमोर (CSK) विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले. हैदराबादची सुरुवात खराब झाली असली असली तरी प्रियम गर्ग (Priyam Garg) आणि अभिषेक नायरच्या (Abhishek Nair) जोडीने डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी केली आणि टीमला आव्हानात्मक धावसंख्येकडे नेले. हैदराबादकडून आजच्या सामन्यात मनीष पांडेने 29, कर्णधार डेविड वॉर्नरने 28 धावा केल्या. दुसरीकडे, सीएसकेकडून दीपक चाहर 2, शार्दूल ठाकूर आणि पियुष चावला यांनी 1 विकेट घेतली. आजच्या सामन्यात दोन्ही टीम विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याच्या प्रयत्नात आहेत. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात सीएसके गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली. ('अभिनंदन माही भाई'! एमएस धोनीने मोडला सुरेश रैनाचा सर्वात मोठा आयपीएल रेकॉर्ड, पाहा काय म्हणाला 'Mr आयपीएल')

टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्यासाठी हैदराबादकडून वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो मैदानात उतरले. पण टीमची खराब सुरुवात झाली आणि चाहरने बेअरस्टोला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर वॉर्नर आणि मनीष पांडेने डाव सावरला, पण दोघे मोठी भागीदारी करू शकले नाही. मनीषला शार्दूल ठाकूरने माघारी पाठवले तर काही वेळाने वॉर्नर देखील मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. प्रियम गर्ग आणि केन विल्यमसन यांच्यातील गैरसमजामुळे न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन रनआऊट झाला.विल्यमसन आजच्या सामन्यात फक्त 9 धावा करू शकला. त्यानंतर प्रियम आणि अभिषेक नायरच्या जोडीने टीमचा डाव पुढे नेला आणि 77 धावांची भागीदारी करत टीमला धावांपर्यंत मजल मारून दिली. नंतर चाहरने दोघांची भागीदारी मोडली आणि 31 धावांवर नायरला माघारी पाठवले. या दरम्यान, प्रियमने आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक ठोकले.

दरम्यान, आजच्या सामन्यासाठी सीएसकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले. अंबाती रायुडू, ड्वेन ब्रावो आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यानंतर रायुडूला दुखापत झाली, तर ब्रावोला दुखापतीमुळे एकही मॅच खेळता आली नव्हती. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नई तळाशी आहे. आजवर खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर मुंबईविरुद्ध मॅच जिंकण्यात चेन्नईला यश आलं. दुसरीकडे हैदराबादचाही 2 सामन्यात पराभव आणि एका मॅचमध्ये विजय झाला. चेन्नईच्या तुलनेत हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते 7व्या क्रमांकावर आहे.