CSK vs KXIP, IPL 2020: सीएसके गोलंदाजांपुढे किंग्स इलेव्हन दिग्गजांनी टेकले गुढगे, दीपक हुडाच्या दमदार अर्धशतकाने सुपर किंग्ससमोर 154 धावांचे आव्हान

आजच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांपुढे पंजाबच्या फलंदाजांनी गोगुढघे टेकले. दीपक हुडाने सर्वाधिक नाबाद 62 धावा केल्या. कर्णधार केएल राहुल 28, मयंक अग्रवाल 26 धावांचे योगदान दिले.

चेन्नई सुपर किंग्ज (Photo Credit: PTI)

CSK vs KXIP, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020च्या 53व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) टॉस जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. अशा स्थितीत पंजाबला 20 ओव्हर मध्ये 6 विकेट गमावून 153 धावांपर्यंत मजल मारता आली. प्ले ऑफसाठीचे स्थान स्टेकवर असताना पंजाबच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. आजच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांपुढे पंजाबच्या दिग्गज फलंदाजांनी गोगुढघे टेकले असताना मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या दीपक हुडाने (Deepak Hooda) संयमी डाव खेळला आणि पंजाबला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. हुडाने सर्वाधिक नाबाद 62 धावा केल्या. कर्णधार केएल राहुल 28, मयंक अग्रवाल 26 आणि मनदीप सिंहने 14 धावांचे योगदान दिले. चेन्नई संघ यापूर्वीच प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडला असल्याने त्यांचा यंदाच्या स्पर्धेतील हा अंतिम सामना आहे. आजच्या सामन्यात गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करून पंजाबला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. सीएसकेसाठी लुंगी एनगीडीने (Lungi Ngidi) 4 ओव्हरमध्ये 39 धावा देत 3 विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि इमरान ताहीर यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IPL 2020: एमएस धोनीचा Yellow जर्सीत आजचा शेवटचा सामना आहे का? CSK कर्णधाराने EPIC प्रतिक्रिया देत केली बोलती बंद)

दुखापतीनंतर संघात परतणाऱ्या मयंक अग्रवालने कर्णधार राहुलसह डावाची सुरूवात केली. दोघांनी आक्रमक फलंदाजी केली, पण एनगीडीच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मयंकचा त्रिफळा उडाला. त्याने 15 चेंडूत 26 धावा केल्या. कर्णधार राहुलला देखील एनगीडीने बाद करून माघारी धाडलं. त्यानंतर पंजाबच्या विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. क्रिस गेल आणि निकोलस पूरन संथ खेळ करत असताना शार्दूल ठाकूरने पूरनला विकेटकीपर धोनीकडे कॅच आऊट केले. इमरान ताहीरने गेलला पायचीतबाद करून संघाला मोठे यश मिळवून दिले. गेलला आजच्या सामन्यात 12 धावाच करता आल्या. मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या मनदीप सिंहला जडेजाने 14 धावांवर बाद केलं. अखेरीस दीपक हुडाने काही मोठे शॉट खेळले आणि पंजाबला समाधानकारक धावसंख्येत महत्वाची भूमिका बजावली. हुडा नाबाद धावा आणि क्रिस जॉर्डन नाबाद धावा करून परतले.

दरम्यान, आजच्या सामन्यासाठी सीएसकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. शेन वॉट्सन, मिशेल सॅटनर आणि कर्ण शर्मा यांच्या जागी फाफ डु प्लेसिस, इमरान ताहीर आणि शार्दूल ठाकूर यांना संधी दिली आहे. दुसरीकडे, पंजाबने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी जेम्स नीशम आणि अर्शदीप सिंहच्या मयंक अग्रवालचा समावेश केला आहे.