CSK vs KKR, IPL 2020: रुतुराज गायकवाडचा केकेआरला दे धक्का! CSKने 6 विकेटने नाईट रायडर्सविरुद्ध मिळवला नाट्यमय विजय

21 वर्षीय रुतुराजने पुन्हा एकदा सीएसकेसाठी शानदार डाव खेळत संघाला विजय मिळवून दिला.

रुतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

CSK vs KKR, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 49व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) पहिले फलंदाजी करत दिलेल्या 173 धावांच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर 6 विकेटने नाट्यमय विजय मिळवला. 21 वर्षीय रुतुराजने पुन्हा एकदा सीएसकेसाठी (CSK) शानदार डाव खेळत संघाला विजय मिळवून दिला. रुतुराजने 72 धावा केल्या तर अंबाती रायुडूने 38 आणि शेन वॉट्सनने 14 धावांचे योगदान दिले. सीएसके कर्णधार एमएस धोनीची अपयशी कामगिरी सुरूच राहिली आणि 'कॅप्टन कूल' आजच्या सामन्यात एकच धावा करू शकला. रुतुराजने सुरुवातीपासून केकेआर गोलंदाजांवर वर्चस्व कायम राखले आणि मोठे फटके खेळत संघाचा विजय निश्चित केला. दुसरीकडे, केकेआरसाठी वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर पॅट कमिन्सने 1 गडी बाद केला. (IPL 2020: आयपीएल 13 मध्ये एमएस धोनीची CSK फ्लॉप की झाली? जाणून घ्या 'ही' 4 कारणं)

वॉटसन आणि रुतुराजची जोडी चेन्नई संघासाठी लक्ष्यचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना चक्रवर्तीने वॉट्सनला रिंकू सिंहकडे झेलबाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. रुतुराजने 37 चेंडूत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. स्पर्धेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते. त्यानंतर पॅट कमिन्सने 38 धावांवर अंबाती रायुडूला सुनील नारायणकडे कॅच आऊट केले. शिवाय, हंगामातील सलग दुसर्‍या सत्रात वरुण चक्रवर्तीने महेंद्र सिंह धोनीला बोल्ड करून माघारी धाडलं. अखेर मोक्याच्या क्षणी कमिन्सने रुतुराजचा त्रिफळा उडवला आणि युवा फलंदाजाला परतीचा मार्ग दाखवला. अखेर रवींद्र जडेजा आणि सॅम कुरनच्य जोडीने अंतिम दोन ओव्हरमध्ये फटकेबाजी करून संघाचा विजय निश्चित केला. जडेजा नाबाद 31 धावा आणि कुरन नाबाद 13 धावा करून परतले. सीएसकेला 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना जडेजाने षटकार लगावला आणि अंतिम चेंडू षटकार मारून संघाचा विजय निश्चित केला.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करताना शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी केकेआरला चांगली सुरुवात करुन दिली. शुभमन 26 धावांवर आऊट झाला, तर नितीशने 61 चेंडूत 87 धावा केल्या. दिनेश कार्तिकने 10 चेंडूत नाबाद 21 धावा करुन नाईट रायडर्सचा स्कोर 170 पार नेला. चेन्नईसाठी लुंगी एनगीडीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर जडेजा, मिशेल सॅन्टनर आणि कर्ण शर्मा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.