क्रिकेट सट्टा रॅकेटचा पर्दाफाश; दिल्ली पोलिसांकडून 11 जणांना अटक, 70 मोबाइल फोन, 2 टीव्ही आणि 7 लॅपटॉप जप्त

त्यांच्याकडून पोलिसांनी 70 मोबाइल फोन, 2 टीव्ही, 7 लॅपटॉप जप्त केले आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (File photo)

रविवारी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा (Cricket Betting) लावणाऱ्या 11 बुकींना, दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) गुन्हे शाखेने छापा घालून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 70 मोबाइल फोन, 2 टीव्ही, 7 लॅपटॉप जप्त केले आहेत. अटकेच्या वेळी आरोपींनी, बंगळुरु येथे भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर जवळपास दोन कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. एके सिंगला यांच्या म्हणण्यानुसार 19 जानेवारी रोजी पोलिसांना माहिती मिळाली होती की, बंगळुरूमध्ये होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर दिल्ली येथे सट्टा लावला जात आहे.

या माहितीवरून पोलिस पथकाने अशोक निकेतन, करकरदूमा आणि अमित अरोरा (48), त्याचा भाऊ अनुज अरोरा (44), रितेश बन्सल (37), अन्सुल बन्सल (27), नवीन कमार (32), रोहित शर्मा (34), रितेश अग्रवाल (38), रोहित रस्तोगी (34), अमन गुप्ता (22), अंकुश बन्सल (38) आणि अनुराग अग्रवाल (35) यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित अरोड़ा या टोळीचा सूत्रधार आहे.

ही टोळी संपूर्ण भारतातून सट्टा दर देत असे. या टोळीने सट्टेबाजीसाठी खास बनवलेले सॉफ्टवेअर वापरले. सट्टेबाजीसाठी अमितने खास तीन फोन कनेक्शन घेतली होती. या कनेक्शनमधून प्रत्येक चेंडूनंतर सट्टेबाजीचा दर सांगितला जात होता. सट्टा हा टॉस, रन, सेशन्स आणि विकेट यांच्यावर लावला गेला होता. (हेही वाचा: IND vs AUS 3rd ODI: बेंगलुरुरू सामन्यात बनले 10 विक्रम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नोंदवले 'हे' प्रमुख रेकॉर्डस्

यासाठी अमितने लॅपटॉपमध्ये दोन अ‍ॅप्स वापरले होते, जे त्याला पंजाबमधील ऑपरेटरने दिले होते. दरम्यान, यापूर्वी 5 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथे भारत आणि बांगलादेश यांच्यातील डे-नाईट कसोटी सामन्यात 5 बुकींना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये 3 जणांना ईडन गार्डनमधून अटक करण्यात आली. सर्व आरोपी मोबाईल अ‍ॅपद्वारे सट्टेबाजी करीत होते.