Emerging Asia Cup 2023: बीसीसीआयने भारत अ संघाची केली घोषणा, कर्णधार यश धुल, रियान परागसह 'या' खेळाडूंना मिळाले स्थान
संघाचे नेतृत्व 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या कर्णधार यश धुलकडे सोपवण्यात आले आहे. तर राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान पराग आणि ध्रुव जुरेल या खेळाडूंनाही यामध्ये स्थान मिळाले आहे.
ज्यूनियर क्रिकेट समितीने आगामी एसीसी पुरुषांच्या उदयोन्मुख संघ आशिया चषक 2023 (Emerging Asia Cup 2023) साठी 13 ते 23 जुलै दरम्यान कोलंबो, श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या भारत अ संघाची निवड केली आहे. आठ आशियाई राष्ट्रांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. संघाचे नेतृत्व 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या कर्णधार यश धुलकडे सोपवण्यात आले आहे. तर राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान पराग आणि ध्रुव जुरेल या खेळाडूंनाही यामध्ये स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा नेहल वढेरा स्टँडबायमध्ये आहे. (हे देखील वाचा: Praveen Kumar Road Accident: पंतनंतर टीम इंडियाचा 'हा' क्रिकेटपटू झाला रस्ता अपघाताचा बळी, कारचे झाले नुकसान; थोडक्यात वाचले प्राण)
भारत-पाकिस्तानचा ब गटात समावेश
भारत अ गट ब मध्ये नेपाळ, यूएई अ आणि पाकिस्तान अ सह तर श्रीलंका अ, बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ आणि ओमान अ गटात आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पहिला उपांत्य सामना अ गटातील अव्वल स्थानी आणि गट ब मधील द्वितीय स्थानी, तर दुसरा उपांत्य सामना 21 जुलै रोजी गट ब मधील अव्वल स्थानी आणि गट अ मधील द्वितीय स्थानी यांच्यात होईल. फायनल 23 जुलै रोजी होणार आहे.
भारत अ संघ:
साई सुदर्शन, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, यश धुल (कर्णधार), रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मानव सुथार, युवराज सिंग डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितीश कुमार रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर
स्टँडबाय खेळाडू: हर्ष दुबे, नेहल वढेरा, स्नेल पटेल, मोहित रेडकर
कोचिंग स्टाफ: सितांशु कोटक (मुख्य प्रशिक्षक), साईराज बहुतुले (गोलंदाजी प्रशिक्षक), मुनीष बाली (फिल्डिंग प्रशिक्षक)
भारतीय सामन्याचे वेळापत्रक
13-जुलै-23 भारत अ विरुद्ध यूएई अ
15-जुलै-23 भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ
18-जुलै-23 भारत अ विरुद्ध नेपाळ