विराट कोहली- रोहित शर्माची भागीदारी मोडण्यासाठी ‘या’ कर्णधाराने मागितली होती थेट अंपायरकडे मदत, वाचा सविस्तर
फिंचने ज्या अंपायरकडे सल्ला मागितला होता, ते अंपायर इंग्लंडचे 40 वर्षीय माइकल गफ यांनी खुद्द या घटनेचा खुलासा केला. सामन्यात विराटने 89 धावा तर रोहितने 119 धावांसह दुसर्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे सध्याच्या काळातील दोन सर्वोत्तम फलंदाज आहेत. अनेक प्रसंगी दोघांनी मिळून विरोधी गोलंदाजांची धुलाई केली आहे. रोहित आणि कोहली फॉर्मात असतील तर ते दोघेही कोणत्याही विरोधी संघाच्या नाकीनऊ शकतात आणि अशाच एका प्रसंगी ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) याने या दोघांना बाद करण्यासाठी थेट मैदावरील अंपायरची मदत घेतली. फिंचने ज्या अंपायरकडे सल्ला मागितला होता, ते पंच इंग्लंडचे 40 वर्षीय माइकल गफ यांनी खुद्द या घटनेचा खुलासा केला. एका संकेतस्थळाशी बोलताना गफ म्हणाले, “मला आठवते की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरू होता. विराट कोहली आणि रोहित शर्मा मोठी भागीदारी केली होती. मी स्क्वेअर लेगवर उभा होतो. माझ्या बाजूला ऍरॉन फिंच थांबला होता. सामना सुरू असताना तो माझ्याकडे आला म्हणाला, या दोन दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहणे अविश्वसनीय आहे.” (जेव्हा पाकिस्तानविरुद्ध 2012 आशिया कप दरम्यान विराट कोहली, रोहित शर्मावर भडकला एमएस धोनी, वाचा नक्की घडलं तरी काय)
“त्यानंतर मला त्याने विचारले की, या दोघांना बाद करण्यासाठी कशाप्रकारे गोलंदाजी करावी? त्यावर म्हणालो, मी माझे काम करत आहे आणि त्यात खूश आहे. आपल्याला जे करायचं आहे त्याचा विचार आपणच करावा,” गफ म्हणाले. 2019 आणि 2020 मध्ये खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेसह आजवर 40 वर्षीय गफने 62 वनडे सामन्यांमध्ये कामगिरी बजावली आहे.
सामन्यात सलामी फलंदाज केएल राहुल 19 धावांवर आऊट झाल्यावर रोहित आणि विराटने डाव सांभाळला आणि टीमला एकहाती विजय मिळवून देण्यास महत्वाची भूमिका बजावली. सामन्यात विराटने 89 धावा तर रोहितने 119 धावांसह दुसर्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. भारतासमोर ऑस्ट्रेलियाने 286 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे टीमने 3 विकेट गमावून गाठले आणि 7 विकेटने सामना जिंकून तीन साम्यांची मालिका 2-1 ने जिंकली.