AUS vs SL 1st T20I: कसुन रजिता याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवला नकोसा रेकॉर्ड, 4 ओव्हरमध्ये लुटवल्या इतक्या धावा
ऑस्ट्रेलियाचे फलंदाजी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज कसुन राजिता याच्याविरुद्ध सर्वाधिक आक्रमक दिसत होते. रजिताने रविवारी अॅडिलेडमधील पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चार ओव्हरमध्ये 75 धावा लुटवल्या.
ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघामधील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. श्रीलंकाविरुद्ध अॅडिलेड ओव्हलमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने रेकॉर्ड 134 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात सलामी जोडी डेविड वॉर्नर (David Warner) आणि एरोन फिंच (Aaron Finch) यांनी महत्वाची भूमिका बजावली. वॉर्नरने नाबाद 100 धावा केल्या तर फिंच 64 आणि ग्लेन मॅक्सवेल 62 धावा करून माघारी परतले. ऑस्ट्रेलियाचे फलंदाजी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज कसुन राजिता (Kasun Rajitha) याच्याविरुद्ध सर्वाधिक आक्रमक दिसत होते. रजिताने रविवारी अॅडिलेडमधील पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चार ओव्हरमध्ये 75 धावा लुटवल्या. एखाद्या गोलंदाजाने कोणत्याही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चार ओव्हरमध्ये दिलेल्या सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. यापूर्वी, तुर्कीच्या तुन्हान तुरान याने झेक प्रजासत्ताकविरुध्द टी-20 मॅचमध्ये 70 धावा लुटवण्याचा विक्रम नोंदवला होता.
वॉर्नरच्या शतकानंतर कर्णधार फिंच आणि मॅक्सवेलच्या अर्धशतकांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये दोन बाद 233 धावा केल्या. वॉर्नरने या मॅचमध्ये टी-20 मध्ये पहिले शतक केले. वॉर्नरने 56 चेंडूत दहा चौकार आणि चार षटकार ठोकले. यापूर्वी, अॅशेस मालिकेच्या 10 डावात वॉर्नर एकूण 95 धावा केल्या. श्रीलंकाविरुद्ध डावाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आपले शतक पूर्ण केले.
वॉर्नर आणि फिंचने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही घातक फलंदाजांनी 122 धावांची भागीदारी रचली आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा जवळ नेले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 233 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असलेला श्रीलंका संघ 20 ओव्हरमध्ये 9 बाद 99 धावत करू शकला. वॉर्नरला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. टी-20 क्रिकेटमधील हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय, तर श्रीलंकेचा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, त्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला.