AUS vs ENG, Ashes 5th Test: होबार्ट कसोटीसाठी इंग्लंडला प्लेइंग XI मध्ये करावे लागणार 5 मोठे बदल, ‘ही’ आहे मजबुरी

ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी आपला प्लेइंग इलेव्हन नुकताच जाहीर केला आहे. तर पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील शेवटच्या सामन्यात ब्रिटिश संघातही काही बदल पाहायला मिळू शकतात.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

AUS vs ENG, Ashes Test 2022: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात अ‍ॅशेस कसोटी मालिकेचा (Ashes Test) पाचवा व अंतिम सामना होबार्टच्या (Hobart) ब्लंडस्टोन अरेना येथे खेळला जाणार आहे. 14 ते 18 जानेवारी रोजी खेळला जाणारा हा सामना गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळला जाणार आहे. यजमान कांगारू संघाने या कसोटी सामन्यासाठी आपला प्लेइंग इलेव्हन नुकताच जाहीर केला आहे. तर पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) शेवटच्या सामन्यात ब्रिटिश संघातही काही बदल पाहायला मिळू शकतात. इंग्लंडचा संघ पाचव्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल पाच बदलांसह उतरू शकतो असे मानले जात आहे. यामागील कारण म्हणजे काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, तर काही खेळाडू फॉर्ममुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होऊ शकतात. इंग्लंड संघाने चौथा सामना अनिर्णित केला असला तरी त्यांनी ही मालिका आधीच 3-0 ने गमावली आहे. त्यामुळे अंतिम सामना जिंकून जो रूटचा संघ दौऱ्याचा शेवट गोड करू इच्छित असतील. (Ashes Test 2021-22: इंग्लंडचा ‘हा’ स्टार खेळाडू पाचव्या होबार्ट कसोटीतून बाहेर, जो रूटने केली पुष्टी)

इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर दुखापतग्रस्त तो मायदेशी परतला असून सलामीवीर हसीब हमीदला फॉर्ममुळे बाहेर केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत सॅम बिलिंग्स यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करताना दिसेल, तर रोरी बर्न्स सलामीवीर म्हणून पुनरागमन करू शकतो. बर्न्स या अ‍ॅशेस मालिकेत खेळला आहे पण तो फ्लॉप ठरल्यामुळे हमीदला संधी मिळाली होती. अशा परिस्थितीत आता 14 जानेवारीपासून होबार्ट येथे होणाऱ्या शेवटच्या सामन्यात इंग्लंड संघ पाच बदल करू शकतो. याशिवाय वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनचे पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याला फिरकी गोलंदाज जॅक लीचच्या जागी संधी मिळू शकते, तर सलग तीन सामने खेळणाऱ्या जेम्स अँडरसनला विश्रांती दिली जाईल आणि त्याच्या जागी क्रिस वोक्सला संधी मिळेल. याशिवाय अष्टपैलू बेन स्टोक्स साइड स्ट्रेन दुखापतीने ग्रस्त आहे त्यामुळे तो गोलंदाजीसाठी उपलब्ध होणार नाही आणि तो एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळताना दिसेल.

दुसरीकडे, सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी जॉनी बेअरस्टोच्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्याला अद्याप फिटनेस क्लिअरन्स मिळालेला नाही. त्यामुळे बेअरस्टो पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही तर ऑली पोपला संधी दिली जाऊ शकते. सॅम बिलिंग्स हा आता इंग्लंडचा एकमेव यष्टिरक्षक आहे जो तंदुरुस्त आहे, परंतु त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचा इतका अनुभव नाही. तीन वर्षांत तो केवळ एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे.