Asia Cup 2022: भारतीय गोलंदाजाने घेतल्या सर्वाधिक विकेट, धावांच्या बाबतीत पाकिस्तानी क्रिकेटर पुढे
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी ही स्पर्धा खूप खास होती. विराटने केवळ तीन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवला नाही तर टी-20 मध्ये पहिल्यांदाच शतकही केले.
श्रीलंकेने पाकिस्तानचा (SL vs PAK) पराभव करत आशिया कप 2022 चे विजेतेपद पटकावले. (Sri Lanka Won Asia Cup 2022) T20 फॉरमॅटमध्ये दुसऱ्यांदा खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेच्या सुरुवातीला कमकुवत आणि पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव लक्षात घेता, श्रीलंकेकडून कोणालाही अपेक्षा नव्हती. मात्र तरुणांनी भरलेल्या या संघाने सर्व अंदाज आणि तज्ज्ञांचे मत चुकीचे सिद्ध करत केवळ अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासच केला नाही तर पाकिस्तानला हरवून ट्रॉफीही जिंकली. श्रीलंका आणि पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचले असतील पण भारतीय खेळाडूंनीही या स्पर्धेत वर्चस्व गाजवले. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी ही स्पर्धा खूप खास होती. विराटने केवळ तीन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपवला नाही तर टी-20 मध्ये पहिल्यांदाच शतकही केले. जाणून घेऊया यावेळच्या आशिया चषकात कोणत्या खेळाडूंचा राहिला दबदबा...
पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 49 चेंडूत 55 धावा करत विराटला मागे टाकले. त्याने सहा सामन्यांत 281 धावा केल्या, 56 च्या सरासरीने आणि 117 च्या स्ट्राइक रेटने. रिझवाननेही या स्पर्धेत एकूण तीन अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराटची कामगिरी प्रत्येक बाबतीत रिझवानपेक्षा सरस होती. एक सामना कमी खेळून विराटने पाच डावात 92 च्या सरासरीने आणि 147 च्या स्ट्राईक रेटने 276 धावा केल्या. यादरम्यान विराटच्या बॅटमधून दोन अर्धशतके आणि एक शतक झळकले. या दोन फलंदाजांनीच 200 धावांचा टप्पा ओलांडला. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानने एकूण 196 धावा केल्या.
आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा
मोहम्मद रिझवान : 281 धावा
विराट कोहली: 276 धावा
इब्राहिम झद्रान : 196 धावा
भानुका राजपक्षे: 191 धावा
पथुम निशांक : 173 धावा
गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारताचा भुवनेश्वर कुमार सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर राहिला. त्याने पाच सामन्यांत 10 च्या सरासरीने आणि 6 च्या इकॉनॉमीने 11 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, दुसऱ्या क्रमांकावर असलेला श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगाने सहा सामन्यांत 9 बळी घेतले. तर पाकिस्तानच्या मोहम्मद नवाज, हॅरिस रौफ आणि शादाब खान यांनी प्रत्येकी 8 बळी घेत अनुक्रमे तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान पटकावले. (हे देखील वाचा: Sri Lanka Won Asia Cup 2022: विजेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंकेवर पडला पैशांचा पाऊस, पाकिस्तानचीही झाली चांदी)
आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स
भुवनेश्वर कुमार : 11 विकेट्स
वनिंदू हसरंगा : 9 विकेट्स
मोहम्मद नवाज : 8 विकेट्स
हॅरिस रौफ : 8 विकेट्स
शादाब खान : 8 विकेट्स