Asia Cup 2021: यंदा आशिया चषक आयोजित करण्यावर PCB चा संकोच, पहा काय आहे नक्की कारण

एशिया कप टी-20 मुळात मागील वर्षी होणार होता पण कोरोना व्हायरसमुळे अखेर त्यांना जून 2021 पर्यंत पुढे ढकलले होते.

पीसीबी अध्यक्ष एहसान मनी (Photo Credit: Getty)

Asia Cup 2021: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष एहसान मनी (Ehsan Mani) यांनी पीएसएल फ्रँचायझी (PSL Franchise) मालकांना सांगितले की, देशातील खेळाची प्रशासकीय संस्था यावर्षी आशिया चषक टी-20 स्पर्धा घेण्यास अनुकूल नाही.पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) 6व्या हंगामाचे उर्वरित सामने जून होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर गुरुवारी पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रँचायझी मालकांना हे कळवण्यात आले असल्याचं पीसीबीच्या (PCB) एका सूत्राने सांगितले. आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या तारखा फ्रॅंचायझी मालकांनी जाणून घेण्याच्या प्रयत्नानंतर मनी यांनी आशिया चषक स्पर्धेबाबत मौन सोडले. “मनी यांनी हे स्पष्ट केले की यंदा होणाऱ्या स्पर्धेची शक्यता कमी आहे आणि सहभागी संघांच्या वचनबद्धतेमुळे हे 2023 मध्ये होईल”, सूत्रांनी PTI ला सांगितले. (Asia Cup 2021: श्रीलंका पुढील वर्षी करणार एशिया कपचे आयोजन तर पाकिस्तानकडे 2022 मध्ये आयोजनाचे अधिकार, PCB CEO वसीम खान यांची माहिती)

दरम्यान, पीसीबी अध्यक्षांनी फ्रँचायझी मालकांना सांगितले की आशिया चषक स्पर्धेच्या नव्या तारखांचा निर्णय आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या पुढील बैठकीत होईल. फ्रँचायझी खेळाडू आणि अधिकाऱ्यांमध्ये कोविड-19 प्रकरणांचा उद्रेक झाल्यामुळे कराची येथे या महिन्याच्या सुरुवातीला लीगमधील 34 सामन्यांपैकी 14 सामने पूर्ण झाल्यानंतर पीएसएलचा सहावा हंगाम मधेच स्थगित करण्यात आला. एक किंवा दोन फ्रँचायझी मालकांनीही असा आग्रह धरला होता की एप्रिल महिन्यात उर्वरित स्पर्धा आयोजित करण्यात आली पाहिजे आणि पीसीबीने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेवर (सीएसए) दबाव आणला पाहिजे. “परंतु पीसीबीच्या अध्यक्षांनी हे स्पष्ट केले की ते असे करू शकत नाहीत कारण सीएसएशी त्यांचे चांगले संबंध आहेत ज्याने फेब्रुवारीमध्ये संपूर्ण कसोटी संघ पाकिस्तानला पाठवून पाकिस्तान क्रिकेटला पाठिंबा दर्शविला होता,” सूत्रांनी पुढे म्हटले. एप्रिल महिन्यात पाकिस्तान तीन वनडे आणि चार टी-20 सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे.

एशिया कप टी-20 मुळात मागील वर्षी होणार होता पण कोरोना व्हायरसमुळे अखेर त्यांना जून 2021 पर्यंत पुढे ढकलले होते. सहभागी देशांच्या पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेमुळे आता स्पर्धा 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात येऊ शकते.