Ashes 2019: लॉर्ड्स टेस्टमध्ये स्टिव्ह स्मिथची विक्रमी खेळी, अॅशेसच्या इतिहासात 'ही' कामगिरी करणारा बनला पहिला फलंदाज
अॅशेस मालिकेतील स्मिथचे हे सलग सातवे अर्धशतक होते. अॅशेसच्या इतिहासातील सलग सात अर्धशतक ठोकणारा स्मिथ पहिला फलंदाज ठरला. स्मिथच्या उत्कृष्ट खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 250 धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंड (England) विरुद्ध अॅशेस (Ashes) मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याच्याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी वर्षभराच्या बंदीनंतर स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्या टेस्टमध्ये दोन्ही डावांमध्ये त्याने विजयी शतकं केली आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानात खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक केले. दुसर्या टेस्टच्या चौथ्या दिवशी त्याने अर्धशतक ठोकून इतिहास रचला. स्मिथने 92 धावांची शानदार खेळी केली. अॅशेस मालिकेतील स्मिथचे हे सलग सातवे अर्धशतक होते. अॅशेसच्या इतिहासातील सलग सात अर्धशतक ठोकणारा स्मिथ पहिला फलंदाज ठरला. (Ashes 2019: लॉर्ड्स टेस्टच्या अंतिम दिवशी जो डेन्ली याने लपकलेल्या टिम पेन याच्या अविश्वसनीय एक हाती कॅचचं Twitter वर कौतुक)
स्मिथने 161 चेंडूत 14 चौकारांच्या साहाय्याने 92 धावा केल्या. क्रिस वोक्स (Chris Woakes) याने स्मिथला एलबीडब्ल्यू बाद करत त्याला माघारी पाठवले. याआधी 30 वर्षीय स्मिथला या खेळीदरम्यान निवृत्त व्हावे लागले होते. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याच्या धोकादायक बाउन्सरमुळे दुखापत झाल्यानंतर स्मिथ खेळपट्टीवर पडला. आर्चरच्या बाऊन्सरने स्मिथच्या मानेचा वेध घेतला. स्मिथ वेदनेने खेळपट्टीवर कोसळला. यावेळी इंग्लंडचे खेळाडू स्मिथला सावरण्यासाठी धावले. तात्काळ वैद्यकीय मदतदेखील मैदानात आली. स्मिथला वेदना होत असल्याने त्याला मैदान सोडावे लागले. पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या स्मिथला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून अभिवादन केले. आर्चरने 90 मैल पेक्षा जास्त वेगाने बॉल टाकला होता. दुखापतीमुळे निवृत्त झालेल्या स्मिथने पुन्हा फलंदाजीचे धाडस केले. निवृत्त होण्याआधी तो 80 धावा खेळत होता. पुन्हा फलंदाजीस आल्यानंतर त्याने आपल्या धावांमध्ये 12 धावांची भर घातली आणि मग वोक्सचा बळी ठरून पॅव्हिलियनमध्ये परतला.
अॅशेस मालिकेतील स्मिथच्या शेवटच्या सात डावांची स्थिती पहा:
239
76
102 *
83
144
142
92
स्मिथच्या उत्कृष्ट खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 250 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात इंग्लंडने 258 धावा केल्या आणि त्यानंतर त्यांना 8 धावांची आघाडी मिळाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी दुसर्या डावात 4 विकेट्ससाठी 96 धावा केल्या होत्या.