IND Beat ENG 5th Test: भारताने पाचवी कसोटी 64 धावांनी जिंकली, तीन दिवसांत संपवला सामना; मालिका 4-1 ने खिशात
5 सामन्यांच्या मालिकेतील 5 व्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. भारताने याआधीच मालिका जिंकली होती.
IND vs ENG 5th Test Match: भारताने पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव (IND Beat ENG) केला आहे. धर्मशाळा (Dharmashala) येथे खेळलेला हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. भारताचा पहिला डाव आज पहिल्या सत्रादरम्यान संपला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 477 धावांवर संपला. अशा प्रकारे टीम इंडियाला 259 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांत आटोपला आणि भारताने एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. आज संपूर्ण इंग्लंड संघ दुसऱ्या डावात गडगडला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. याशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चार सामने जिंकले.