Pune Shocker: लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला केली मारहाण; दिली गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी
घाबरलेली मुलगी मावशीच्या घरी जाऊन लपली. अखेर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी कांबळेविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.
पुण्यात लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या तरुणीला 20 वर्षीय तरुणाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यासह त्याने गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली. हे एकतर्फी प्रेमाचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले. अहवालानुसार, प्रशांत एस. कांबळे नावाच्या व्यक्तीने 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी पुण्यातील नानापेठ येथे 19 वर्षीय तरुणीची भेट घेऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिने स्पष्ट नकार दिल्याने कांबळेने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचण्यास सुरुवात केली. तिने विरोध केल्यावर त्याने तिला थप्पड मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलगी कशीतरी त्याच्या तावडीतून सुटून पळून जाण्यात यशस्वी झाली.
घाबरलेली मुलगी मावशीच्या घरी जाऊन लपली. अखेर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी कांबळेविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. यानंतर तपास अधिकारी दीपक यादव यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आता प्रशांतच्या विरोधात कठोर कलमे लावण्याची योजना आखली आहे, ज्यात किमान सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Safer City For Women: महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यापेक्षा नागपूर ठरले महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर; NCRB अहवालात खुलासा)